कोकणामधले एक छोटेसे गाव... हरकुळ...सकाळी सकाळी तालुक्यावरून सरकारी माणसे गावात दाखल झालेली... ग्रामपंचायतीमध्ये लगेच लगबग सुरु झाली..आणि "हरकुळ मधला हडकुळा" म्हणजे रमेश उर्फ 'रमल्या' याला सांगावा धाडण्यात आला... गाढ झोपेत असलेल्या रमल्याची खाटेसकट उचल बांगडी झाली ती थेट ग्रामपंचायतीमध्येच...
रमल्या : सायबानु... माका हयसर कशाक बोलवलात..
सरकारी साहेब : तुला ISRO मधून बोलावणे आलेय...
रमल्या : आता काय 'इसरो'क झाला म्हणून तुम्ही हयसर इलात...सांगुन ठेवतय आजकाल माझ्या काय सुद्धा लक्षात रव्हत नाय... तुम्ही काय इसरलास ता माका ठावुक नाय...
सरकारी साहेब: अरे ISRO म्हणजे एक संस्था आहे... तुझी निवड झालीय चंद्रयान मोहिमेवर...तुला चंद्रावर जायची संधी मिळतेय !! लगेच तुझी बॅग भर आणि निघ...
रमल्या : मी नाय जाऊचय... आय ओरडतली माका... दिवसभर गाव भटकत बसतय म्हणून आय गाळी घालत रव्हता... चंद्रावर गेलय तर माका कुटून जात्यावर दळून ठेवात ती...
सरकारी साहेब: अरे घाबरू नकोस...राकेश शर्मा सुद्धा गेला होता चंद्रावर...
रमल्या : शर्मा वर्मा गुप्ता पांडे... खय पण जाऊ शकतत... कोकणात सुद्धा आता जय थय भैय्येच दिसतत...आणि माका तर फक्त सायकल चालवूक येता... माझो काय उपयोग थयसर... लहानपणी चांदोबा वाचूक आवडायचा... पण चांदोबावर जाऊन काय करू मी?? हयसर रव्हान काय कामधंदो जमलो नाय करुक... त्यापेक्षा माका मुंबईक पाठवा...
सरकारी साहेब: अरे तुला काही चंद्रयान चालवायचे नाहीय... तू फक्त आतमध्ये बस आणि चंद्रावर जा...तिकडे माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो तेवढेच आम्हाला बघायचे आहे...
रमल्या : या बरा असा सायबानु... माका मारुचो प्लान चांगलो असा... सावंतांचो राजू बोललो असतलो माझा नाव तुमका... मायझयो माझ्या जीवावरच उठलो असा...
सरकारी साहेब: हे बघ रमल्या... नाही तरी तू दिवसभर गावामधल्या पोरींच्या पाठी फिरत असतो... गावातल्या सगळ्या लोकांची तक्रार आहे तुझ्या विरुद्ध... आणि तुझी आई तुझ्या नावाने रोज शंख करत असते... तू चंद्रावरून परत आलास नाही तरी तुझ्या नावाने पेंशन चालु राहेल तुझ्या आईसाठी...आणि सरकार एक बक्षिस सुद्धा जाहीर करेल गावच्या होतकरू मुलांसाठी... कै. अंतराळवीर रमल्या परब स्मरणार्थ !! तुझे वजन सुद्धा इतके कमी आहे की चंद्रयानसाठी कमी इंधन लागेल... पर्यावरणाला तुझी मदत होइल...
रमल्या : अवो सायबानु... इंधन कमी पडात असाल तर माझ्या अंगणातलो सगळो लाकुडफाटो देतय चंद्रयानाच्या चुलीत घालुक ...पण त्या राजू सावंताक पाठवा चंद्रावर...
सरकारी साहेब: तू आता काही एक बोलू नकोस... वरून आदेश आलेला आहे...सरकारने ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत तुला 'वरती' पाठवायचा निर्णय घेतलेला आहे...
रमल्या : आता तुम्ही ठरवलेलाच असाल तर एक विनंती असा माझी... मालवणकरांच्या 'हेमा'क पाठवा माझ्या बरोबर... चंद्रावर हनीमून काय म्हनतत ता करुक गावात आमका... जगातला पयला जोडा असात आमचा... असो विक्रम करणारा... हवेत तरंगत !!
सरकारी साहेबाने एवढा वेळ राखलेला संयम अखेर संपलाच... रमल्याच्या अंगावर धावत जावून ओरडलाच... "अरे तू return journey ला काय standing प्रवासी घेउन येणार आहेस का S.T. सारखे ?? याला आधी कोणीतरी गोणत्यात बंद करून घेउन जा रे...जाम डोक्याची ***य याने..."
अखेर रमल्या चंद्रावर गेलाच... आयुष्यात जो माणूस कणकवली स्टेशनवर फक्त कोकण रेल्वे बघायला गेला...तो आज भारताने चंद्रावर बांधलेल्या Space Station वर आपला बोजा-बिस्तरा घेउन गेला होता... आईने दिलेल्या सुकटाच्या डब्यासकट !! मग..."चंद्रावर खय ताजा म्हावरा गावतला !!' ... इति रमल्याची आई...
रमल्या चंद्रावर उतरून बघतो तर काय...वेगवेगळ्या देशातली बरीच माणसे अगोदरच तिथे येउन संशोधन करत होती...(पाकिस्तान सोडून...कारण त्यांचा जीव अजुन काश्मीरमधेच अडकला होता...सरडयाची धाव कुंपणापर्यंत...तशी पाकिस्तानची धाव काश्मीरपर्यंतच!!) आणि तिकडे धंदा करायला बरेच भैय्ये सुद्धा आले होते...इस्त्रीवाला...(अंतराळवीरांचे पोशाख इस्त्री करून द्यायला)...पानवाला...दूधवाला (हो...गोरेगावसारखे तबेले सुद्धा होते तिथे)... सगळयांच्या झोपडया पद्धतशीर तयार होत्या... झोपड़पट्टी पुनर्विकास योजनेमध्ये सामील व्ह्यायला...
रमल्यानेसुद्धा तिथे लगेच बाजुला एक झोपडी बांधून घेतली...आणि लगेचच त्याचे शेजारयाबरोबर भांडणसुद्धा सुरु झाले... " आवशीचो घो तुझ्या.... मी मालवणी माणूस असय... समाजला?? माझो गडघो (म्हणजे चिरयाचे कुंपण) मी हयसरच बांधतलय... आमच्या कोकणातल्या कोर्टात अर्ध्यापेक्षा जास्त खटले भावाभावातच असत... मरेपर्यंत काम नाय करुचव आम्ही... पण खटले मात्र लढवू वीतभर जागेवरून... आणि माका तुमच्या सारखो धंदो नाय करुचो असा हयसर... १० गुंठे जागा हवीच असा माका... आंबो-माड लावून बाग उठवतलय...तुमका गडी म्हणून ठेवतलय आणि मगे खयच्या तरी मद्राशाक विकेन सगली जागा बागेसकट ...कोकणात सुद्धा आम्ही याच केला अजुन पर्यंत... रांडीचो... माका शिकवता माझी जागी किती असा ती...तुझो सात-बारयाचो कागद दाखव पयलो"
रमल्याने आपला मालवणी बाणा दाखवायला सुरुवात केलीच होती...तेवढ्यात तिकडे एक परदेशी संशोधक "यूरेका यूरेका" म्हणून ओरडायला लागला...रमल्या तिथे लगेच धावला...बघतो तर त्या फिरंगीला चंद्रावर पाणी सापडले होते... म्हणून तो आनंदाने नाचत होता आणि रमल्या पोट धरून हसायला लागला...
संशोधक: What happened to you?
रमल्या: तुझ्या आवशीक खाल्ल्यान कोल्ह्यान... अरे मी थयसर मुतान ठेवललय !!
संशोधक: What?? I didn't get you !!
रमल्या: तुका नाय समजला? मग 'पी' ता सगळा !!
संशोधक: 'Pee'?? Ohh my god !!.... एवढे ओरडून तो संशोधक गायब झाला...
रमल्या: आता बरा समजला याका मी काय बोललय ता....
तेव्हा पासून तो संशोधक एखादा 'दगड' जरी दिसला तरी हात लावायला तयार होईना !!
रमल्या असाच फिरत होता तिकडे... तर एक परदेशी तिकडे उघडा बसून योगा करत होता... रमल्याने त्याला काय करतोय म्हणून हातानेच खुण केली...
परदेशी: I am looking for Inner Peace !!
रमल्या: Inner Piece?? बरा तू काळजी करू नको... माझ्याकडे चड्डी बनियानची एक जोडी बॅगेत असा एक्स्ट्रा... तुका माझ्या अंगावरचीच काढून देतय... भोका पडलेली असत...पण चंद्रावर कोण बघतला तुका...घाल तू !!
रमल्याला कपडे काढताना बघून तो परदेशी अक्षरक्ष: ढुंगणाला पाय लावून पळूनच गेला (ह़े योगासन त्याने प्रथमच केले असेल)
रमल्या: मायझयो...जोराची झाली वाटता त्याका...!!
तेवढ्यात त्याला माशांचा वास आला... आजुबाजुला बघतो तर एक भैया ओरडत चालला होता..."मच्छी का पानी...बाजू हटो..." आणि त्या पाण्याचे शिंतोडे रमल्याच्या अंगावर उडाले...त्या भैयाला एक कचकचीत मालवणी शिवी रमल्या घालणारच होता...त्या क्षणालाच...
रमल्या जागा झाला...
त्याच्या आईने बोंबिल साफ करून उरलेले पाणी त्याच्या तोंडावर ओतले होते..." भीकमागो खयचो...दिवसभर झोपून रव्हता... एक पैसो कमवूची अंगात धमक नाय...शिरा पडली तुझ्या तोंडावर...उठ रे...फटकी इली तुझ्या अंगावर....!!!"
रमल्याचा स्वप्नभंग झाला...!!
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
2 comments:
zakkas jamalay!
mastch!
टिप्पणी पोस्ट करा