माझी आऊस....

 लहानपणी प्रत्येकानेच शाळेत 'माझी आई' या विषयावर निबंध लिहिलेला असेलच … आज आईच्या एकसष्टीनिमित्त मला परत एकदा अशी संधी मिळतेय…

तशी आई आणि माझी ओळख फार जुनी आहे… आमची पहिली भेट दादरच्या ठाकूर हॉस्पिटलला झाली… आम्ही दोघे एकाच बेड वर होतो… त्याकाळी मी नेहमीच पिऊन पडलेला असायचो… म्हणून मला फारसे काही आठवत नाहीय…

आई म्हणजे हट्ट करायचे हक्काचे ठिकाण… आणि तो हक्क मी पुरेपूर बजावला … शाळा सुटल्यावर आईला ओढत नेउन स्टेशनरी दुकानात काही ना काही विकत घ्यायला लावायचोच मी … तिथे काही घेऊन दिले नाही तर थोडे पुढेच एक पेपरचे दुकान होते … तिथे ठकठक किंवा चंपक विकत घ्यायचा हट्ट करायचो मी … बाकीचे मुले त्या वयात खेळणी घ्यायला रडायची आणि मी मात्र पुस्तकांसाठी रडायचो… त्या अश्रूमय अवस्थेत भर रस्त्यावरून आईबरोबर माझी मिरवणूक बाबांच्या दुकानात यायची आणि  बाबांना बघून लगेच विसर्जित व्हायची… भाजी आणि इतर सामान घेऊन उरलेले आईच्या पाकिटातले पैसे असेच संपायचे माझ्या अशा हट्टापायी…

एकदा आम्ही माहेरची साडी चित्रपट बघायला गेलेलो … ते सुद्धा घरातल्या एकुलत्या एक महिला वर्गाला घरीच सोडून … घरी येताना बाबांनी टिकटिक आवाज करणारी बेडकी विकत घेऊन दिली नाही म्हणून मी रडत आलो … आणि बिचाऱ्या माझ्या आईला वाटले की अलका कुबलचे हाल बघून हा घरी रडत आला की काय …

शाळेत सोडण्या-आणण्या व्यतिरिक्त आईला माझ्या बाईंच्या तक्रारींचा सुद्धा सामना करावा लागायचा … एकदा PT च्या शिक्षिकांना त्यांची पाठ वळताच मी वेडावून दाखवलेले … आणि एकदा मार्क्स कमी दिले म्हणून  बाईंना कमी दिसते आणि त्यांनी चष्मा लावला पाहिजे असे मी भर वर्गात जाहीर केलेले … अशा कठीण प्रसंगांना आणि माझ्या पराक्रमांना आईलाच तोंड द्यावे लागायचे शाळेत …

एकदा मी शाळेच्या नाटकामध्ये भाग घेतलेला ज्याचे काही प्रयोग शालेय स्पर्धांमधून झाले … माझे नाटकात जेमतेम ३-४ संवाद असतील आणि ते सुद्धा स्टेजवर मी ऐन वेळी विसरायचो …यात भरीस भर म्हणून आई मला न्यायला आली की मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक का नाही मिळाले असे विचारून तिच्याकडे भोकाड पसरायचो…माझ्यातले अभिनय गुण ओळखून आईने मला परत कधीही नाटकामध्ये भाग घ्यायला दिला नाही … आईच्या पारखी नजरेला खरेच दाद द्यायला हवी…

रोज संध्याकाळी वाडीतून मी आणि दादा मातीत लोळून आणि खेळून आलो की आम्हाला गरम पाणी देऊन धुवून काढायचे काम आईने केले …अशा तऱ्हेने तिने आमच्यामधल्या क्रीडा गुणांना उत्तेजन दिले….

आई दुपारी झोपली की खाऊचे डब्बे उघडून तिची झोपमोड करायचो आम्ही… तेव्हापासून तिला आजही झोपेची समस्या जाणवते आणि रात्र रात्र भर तिला झोप येत नाही…

आईच्या हातचा मार आम्ही कधीच खाल्ला नाही … कारण ते काम तिच्या हातातल्या झाडूने व्हायचे… सातवीची मँट्रिक परिक्षा पास झाल्यानंतर आई शिक्षिका झाली असती तर तिच्या हातात छडीच्या एवजी झाडूच असता यात मला काही शंका नाही…

परीक्षा जवळ आली की पाठांतर करून घ्यायला आई रात्री उशिरापर्यंत जागायची माझ्याबरोबर … बाबांना झोपेतून मध्येच जाग आली की ते ओरडायचे …"अगो बस झालो अभ्यास …झोपतस की नाय … "

चौथीला शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी माझ्याएवढीच आईने सुद्धा केलेली … शाळा सुटल्यानंतर भरणाऱ्या  क्लासेसच्या अगोदर आई जेवणाचा डब्बा घेऊन यायची …मी जेवल्यानंतर ती परत घरी जायची आणि पुन्हा यायची क्लासेस सुटल्यानंतर घरी घेऊन जायला … दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण दिवसभर क्लासेस असायचे तेव्हा फराळ आणि दिवाळीची तयारी सांभाळून ती शाळेत चकरा मारायची माझ्यासाठी … त्या वर्षी मी एवढा भयंकर अभ्यास केलेला की माझ्या अंगावर पित्त यायचे … लालेलाल झालेल्या आणि ढोंगपोंग आलेल्या माझ्या अंगावर कोकमाचे पाणी लावत असतानासुद्धा तिने माझा अभ्यास घ्यायचा काही थांबवले नाही …आणि या सगळ्याची खंडणी म्हणून मी आईकडे स्कॉलरशिप परीक्षा संपल्यानंतर मला चोकोबार विकत घेऊन द्यायचे कबूल करून घेतले होते… परीक्षेच्या दिवशी आईने दिलेला शब्द पाळला आणि त्या परीक्षेत मी महाराष्ट्रात २२वा येउन आईची मेहनत आणि चोकोबारचे पैसे दोन्हीही सार्थकी लावले …

एकदा आईची साडी माझ्या आजोळी आलेल्या एका पाहुणीने नेसली होती आणि मी तिला आई समजून पाठी मागून मिठी मारलेली … बाकीचे सगळे हसायला लागल्यावर माझी फजिती मला समजली आणि माझा भोंगा वाजायला सुरुवात झाली…  त्या पाहुणीला मात्र माझ्या हातवारे केलेल्या तांडवाचा परिणाम भोगावा लागला…  हा किस्सा ऐकल्यापासून मंजिरी कोणालाही तिचे कपडे वापरायला देत नाही हयाची माझ्या चाणाक्ष मेंदूने नोंद करून ठेवलीय…

दर वर्षी आईच्या वाढदिवसाला माझी एक ठरलेली भेट असायची …वहीचे पान फाडून जोकर गम लावून मी एक आहेर पाकीट बनवायचो आणि त्यात भरायचो काय…. तर आईच्या पाकीटामधून मिळालेली किंवा काढून घेतलेली चिल्लर जी मी वर्षभर साठवून ठेवलेली असायची … नाण्यांच्या वजनाने जड झालेले ते पाकीट आई तसेच न फोडता सांभाळून ठेवायची कपाटामध्ये …

आज जी काही मालवणी भाषा आम्हाला समजते त्याचे सगळे श्रेय आईला जाते… आम्ही तिच्या बरोबर नेहमी शुद्ध मराठीमध्ये बोलत असलो तरी आई आमच्याशी नेहमी मालवणी भाषेतच बोलते…"शिरा पडली तुझ्या तोंडावर" किंवा "फटकी ईली ती तुझ्या तोंडावर" असे आईचे उद्गार आमच्या कानावर नेहमी आदळत असले तरी आमच्या तोंडात सदैव आईने बनवलेले चमचमीत पदार्थच पडत राहिले…

दहावीमध्ये वर्गात मस्ती करत असताना सरांचा कानाखाली प्रसाद मिळून माझ्या चष्म्याचे निर्माल्य झाले होते… आता ही सत्यनारायणाची पूजा घरी बाबांना सांगणार कोण या गहन विचारात असताना आईरूपी भटजीला गाऱ्हाणे घालायला सांगायचे असे मी ठरवले … खेळायला जायचे म्हणून आईबरोबर भाजीला जायला नकार देणारा मी… त्या दिवशी मात्र मी स्वत:हून आईबरोबर रेशनच्या दुकानात जायला तयार झालो … रस्त्यात चालताना आईला सगळे सांगून टाकले… अपेक्षेप्रमाणे आईने मला बाबांपासून वाचवले आणि दुसऱ्या दिवशी चष्मा घालायला माझे कान शाबूत राहिले …

कॉलेजच्या लायब्ररीमधून आणलेल्या पुस्तकांमधून निवडक पाने, कविता किंवा गोष्टी  मी आईला आग्रहाने वाचायला लावायचो … त्या निमित्ताने देशपांडे, पाडगावकर, कणेकर, प्रभावळकर अशी मंडळी आईच्या ओळखीची झाली….क्रिकेटची वनडे मॅच रंगात आली की शेवटच्या ओवर्समध्ये आई टीव्हीकडे बघत विचारायची …किती व्हये असत … तिला आकडा सांगितला की तिचे ठरलेली वाक्ये असायची… मग काय होतले … किंवा … एव्हढे काय होउचे नाय …

आईला गजाली मारायची फार हौस … आत्या किंवा मावशी घरी राहायला आल्यावर तिच्या गप्पांना ऊत येतो … एवढा की अंथरुणात पडल्यानंतरसुद्धा तिची बडबड चालू राहते …. ते अगदी तिच्या लक्षात येईपर्यंत की या घरात फक्त २ आवाज ऐकू येत आहेत….  ते आवाज म्हणजे एक तिचा आणि दुसरा बाबांच्या घोरण्याचा … आणि गम्मत म्हणजे गप्पा ऐकणारी व्यक्ती कधीच डाराडूर झोपून गेलेली असते …

असे म्हणतात की संत-महात्मे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भक्तांना दर्शन देतात … अगदी तसेच आमची आई शरीराने मुंबईत असली तरी मनाने कणकवलीच्या घरात वावरत असते,,,, १०० Days मधल्या माधुरीच्या स्वप्नांप्रमाणे आई स्वप्नातसुद्धा पुढच्या मुक्कामात ती तिथे काय करणार आहे याचे भविष्य बघत असते …  कोकणात रहायला जायचे आमचे स्वप्न आहे आणि इथे तिच्या स्वप्नातच कोकण असतो नेहमी …

आईचे एक खास कौशल्य म्हणजे घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे शव-विच्छेदन अनेक वेळा आणि वेगवेगळ्या पद्धतीने असंख्य कारणे शोधून ती करू शकते… कारणांची सुद्धा उप-कारणे ती शोधू शकते … मला खात्री आहे की तिला शालेय परीक्षेत 'शास्त्रीय कारणे द्या' विभागात पैकीच्या पैकी गुण मिळाले असतील…

बाबांची साठी जेव्हा साजरी केली तेव्हा मी म्हणालो होतो की आमचे आई बाबा नेहमीच विठ्ठल-रुक्मिणीसारखे आमच्या पाठीशी उभे आहेत … या वेळी त्यात एवढीच भर घालेन की  त्यांचे हात फक्त कंबरेवर ना राहता आशीर्वादासाठी आमच्या डोक्यावर असतीलच आणि वेळप्रसंगी काही चुकले असेल तर ते हात आमच्या पाठीत धपाटा घालायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत याबाबतीत मला काही संदेह नाही….









2 comments:

  1. Unknown म्हणाले...:

    खूपच छान योगेश ! आई आणि तुझ्यातील नाते विनोदी अंगाने लिहिलेले फार आवडले. Keep it up !

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.