खेळ सांडला....

नवीन व्याख्या : राष्ट्रकुल स्पर्धा इति Common Wealth Games म्हणजे Common माणसाच्या Wealthचा झालेला Game...

एखादी स्पर्धा सुरु होण्याअगोदरच नवनवीन विक्रम रचले जाण्याचे हे इतिहासातले पहिलेच उदाहरण असावे... भ्रष्टाचाराच्या सुवर्णपदकांचा मुसळधार पाउस पडावा अशी देदीप्यमान कामगिरी कलमाडी अन प्रभुतीनी केलीय... अन्नटंचाईनिर्मित महागाईला आवर घालताना काँग्रेसला नाकीनऊ आले... आणि आता कलमाडीनिर्मित महागाईला लपवताना त्यांची पळता भुई थोडी झालीय... "कलमाडी हे तिथे ऑलिंपिक संघटनेचे अधिकारी म्हणून काम करत आहेत... काँग्रेस सदस्य म्हणून नाही..." असे बेजबाबदार विधान करून पक्षाने आपली निशाणी (अर्थात हात) वर केलेले आहेत .. हे म्हणजे... "आमचा कार्टा आमच्या अंगणात गोटया खेळतो तोपर्यंत आमचा मुलगा आहे... उद्या त्याने देशपांडेंच्या खिडकीवर दगड मारला तर तो बाजुवाल्याचा मुलगा" अशी पलटी मारण्यासारखे आहे... रिअलिटी शो च्या विजेत्यापासून रिक्शा स्टँड कमिटीच्या कार्यकर्त्यापर्यंत वाटेल त्याचे अभिनंदन करणारे फ्लेक्सबोर्ड लावणारे पक्ष याही थराला सुद्धा जाऊ शकतात याचे प्रत्यय या निमित्ताने आले... भ्रष्टाचार पोट फुटेपर्यंत केला तर हगवकशी होते याचा धडा राजकारण्यांनी गिरवावा एवढी ही केस-स्टडी मनोरंजक झालीय... अरे काही पटेल / पचेल एवढे तरी तारतम्य बाळगा रे !! टॉयलेट पेपरचा रोल चार हजार रूपयांना मिळावा एवढा आपला हिंदुस्तान श्रीमंत झालाय?? अजुन पर्यंत एखाद्याला फसवणे म्हणजे तोंडाला पाने पुसणे असा वाक्प्रचार अस्तित्वात होता... आता एखाद्याला लुटणे म्हणजे ढुंगणाला टॉयलेट पेपर पुसणे असा नवीन वाक्प्रचार जन्माला येइल...काही शेकडा रुपयांची वस्तू हजारो रुपयांना विकणे म्हणजे फक्त हरभजन मुरलीधरनचा ०० बळींचा विक्रम मोडू शकेल अशी अतिशयोक्ती करण्यासारखे आहे...

क्रिकेट हाच धर्म मानणारया या देशात इतर खेळांकडे सदोदित उपेक्षाच वाटयाला आली... म्हणजे मल्लिका शेरावतने अभिनयाचे अंग दाखवायचा कितीही जिवापाड प्रयत्न केला (अजुन पर्यंत केल्याचे बघण्यात अथवा ऐकिवात नाही) तरी प्रेक्षकांच्या नजरा तिच्या आंगिक अभिनयाकडेच असतील...त्यातलीच ही अवस्था... सानिया...सायना... विजेंद्र... इत्यादी क्रिकेटेतर खेळाडू स्टार झाले खरे... पण प्रॉब्लेम हा झालाय की ते आपापल्या खेळापेक्षा मोठे स्टार झालेत... इथे इतर खेळांची ही दुरावस्था... खेळ संघटनांचे तर याहून वाईट हाल आहेत...कोणीही यावे...कुठल्याही खुर्चीवर बसावे असा या खेळ संघटनांचा कारभार...प्रत्येक खेळ संघटनेच्या महत्वाच्या पदांवर राजकारणी असणे हीच मूळव्याध क्रीडाक्षेत्राला नको त्या ठिकाणी टोचतेय... पोलीस दलामधले गिलसाहेब भारतीय हॉकीला घोरपडीसारखे चिकटून सुतार पक्ष्यासारखे चोच मारत होते बरीच वर्षे... किती हॉकी कर्णधार पराभवाच्या कारणाखाली बदलले गेले... हे मात्र आपले बूड उचलायला काही तयार नाही... आपले पवारसाहेब क्रिकेट सांभाळत आहेत... खासदार मोहम्मद अझरूद्दीन बॅडमिंटनची निवडणुक लढवून नको तिथे "ज्वाला" भडकवतो... खेळ कुठलाही असो... संघटनांचे राजकारण "संगीतखुर्ची" च्या नियमांनुसार चालते... जेवढा वेळ बसाल...तेवढा वेळ ती "रंगीत-खुर्ची"...

मला वाटते...एखादा परमोच्च आशावादीच यातूनही काही तरी सकारात्मक अपेक्षा ठेवू शकतो... उदाहरणार्थ... धावपट्टी (Running Track) बनवण्यात सुद्धा भ्रष्टाचार होउन मोठमोठाले खड्डे पडलेत...आणि "अडथळयांची शर्यत" याऐवजी "खड्ड्यांची शर्यत" अशी नवीन स्पर्धा घेतली जाईल... भारत्तोलन (Weight Lifting) प्रकारात दाखवलेल्या वजनापेक्षा कमीच वजनाचे रॉड पुरवले जातील आणि नवनवीन विक्रमांची नोंद होइल... राष्ट्रकुल स्पर्धांमधे अजुन काय बघायला मिळेल हे खरेच मनोरंजक ठरेल...

बाकी काहीही म्हणा... मीडियाने आरोप करायची वेळ सुद्धा थोडीशी चक्रावून टाकणारीच आहे... स्पर्धा अगदी तोंडावर आली असताना काम पूर्ण करण्यातली दिरंगाई अथवा कल्पनातीत भ्रष्टाचार उघडकीस आणायचे म्हणजे... लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोच्या / नवरयाच्या भूतकाळाबद्दल चौकशी करण्यासारखे आहे... कल्पना करा की सरकारने दिलेले आश्वासन खरोखर पाळले तर ही सगळी CWG चा 'खेळ'खंडोबा करणारे राजकारणी आयोजक गजाआड जातील आणि ते सुद्धा तुरुंगामधून खेळ संघटना सांभाळतील... जसे गँगस्टर लोक आपली गँग चालवतात अगदी तसे...

एका उद्योग समुहाने वृत्तपत्रात पानभर जाहिरात दिली की CWG ची तयारी पूर्णत्वास नेणे आणि खेळांचे व्यवस्थित आयोजन करणे हे आपले राष्ट्रीय कर्त्तव्य आहे... राष्ट्राच्या नावाने काय गंमत करता का राव??... CWG पार पाडतानाच एवढी हातभर फाटलीय की आँलिंपिक खेळांचे यजमानपद कुठल्या तोंडाने मागू आपण?? समीरा रेड्डीने वर्षातून एका मसाला फिल्म मधे मिनिटाचे आयटम साँ करून आर्ट फिल्म मधे लीड रोल मागायला जावे तशी आपली गत होइल... यजमानपद बहाल होऊन एवढी वर्षे झाली तरी अजुन आपल्याला काम पुरे करता आले नाही आणि कसल्या राष्ट्रीय अभिमानाच्या गप्पा मारतात हे लोक... आपल्या खेळांडूना किती पदक मिळतील याची कोणाला काही पडलेली नाही... तिकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू हॉटेलमधील सुविधांच्या नावाने शिमगा करत आहेत... त्याचे काही सोयरसुतक नाही...मग लक्ष कशाकडे आहे आपले...टेंडर कितीचे निघाले...कोणाला मिळाले... CWG संपल्यानंतर बांधलेल्या बिल्डिंग्समधल्या जागा कशा घशात घालता येतील... खेळांडूची ने-आण करण्यासाठी विकत घेतलेल्या बसेस कशा लिलावात विकत घेता येतील...सगळ्यांचे याकडे डोळे लागलेले...

आता एवढया थोडया दिवसात यावर एक उपाय आहे... आयता यमुना नदीला पुर आलेला आहे... दिल्ली मधे तूफान पाउस पडतोय... आपल्या लोकशाहीच्या नागडया अवस्थेसारखे उघडे पडलेले खड्डे पाण्याने भरून त्याचे स्विमिंग पूल तयार झाले असतील... बाकीचे खेळ रद्द करून फक्त जलतरण स्पर्धा, वॉपोलो यासारखे पाण्यातले खेळ भरवा... पाहिजे तर CWG चे नामकरण Winter Olympics च्या धर्तीवर Monsoon CWG करा... आणि यात सुद्धा कलमाडी साहेब खड्डे खोदण्याच्या नाममात्र खर्चात स्पर्धा भरवायचे श्रेय लाटतील...याबद्दल काही शंका नाही.... फ्लेक्स बोर्ड लावायला अजून एक नामी संधी... !!!

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.