लोकल ट्रेनचे जाहिरातविश्व आणि मी !

लोकलच्या प्रवासात कंटाळा आला की समोर बसलेल्या लोकांच्या पेपरमध्ये आणि शेजारील प्रवाश्याच्या मोबाईलमध्ये डोकावून आपला वेळ घालवता येतो... काहीच नाही तर मोबाइलमध्ये आकंठ बुडालेल्या दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे निरीक्षण करणे ही सुद्धा एक गम्मत आहे... पण माझ्या मते त्याहूनही मोठे करमणुकीचे साधन म्हणजे लोकल ट्रेनमध्ये लावलेल्या जाहिराती वाचणे !

मी केलेल्या अथक संशोधनाअंती असे आढळून आले आहे की लोकल्समधील जाहिरातींत बंगाली बाबांचा निर्विवाद 'प्रभाव' दिसून येतो... वशीकरण, मुठकरणी, जादूटोणा, काळी जादू ही त्याच्या पोतडीतली रामबाण अस्त्रे परजत जगातल्या सर्व समस्या सोडवायला जन्माला आलेला तो दुनियेचा तारणहार असतो...  टुरिस्ट कार, घरी बसून कमवा, फक्त १०,००० रुपये भरून घर बुक करा अशा अनेक जाहिराती वेताळाचे रूप घेऊन माझ्यासारख्या विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसून प्रश्नांचा भडीमार करत माझ्या टक्कल पडलेल्या डोक्याची शंभर शकले करतात... तर आता माझ्या मेंदूतील शंका मांडून या जाहिरातींमधील समस्यांचा सविस्तर उहापोह करूया:

सर्वात अगोदर माझ्या लाडक्या बंगाली बाबांच्या जाहिरातीबद्दल बोलूया :

१. मनचाहा प्यार, सास -बहू में अनबन, माता पिता को मनाना, संततिसुख: बंगाली बाबांना कुठलीही फटाकडी पोरगी सहज पटत असेल का? पटलीच तर त्यांचा प्रेमविवाह बिनविरोध होत असेल का... लग्नाच्या तारखेपासून बरोब्बर नऊ महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलत असेल का ...  त्याच्या घरी त्याची बायको आणि त्याची आई गळ्यात गळे घालून गाणी म्हणत असतील का ... त्याची सासू घरी राहायला आल्यावर त्याच्या सोबत 'आओ मीना' म्हणत टाळ्या देत खेळत असेल का?

२. बिछडे प्यार को मिलानाप्यार में चोट खाये प्रेमी प्रेमिका इक बार अवश्य मिलीये: जर एखादा प्रेम-मार्गदर्शक बाबा बंगाली भेटला असता तर लैला-मजनू, हीर-रांझा, देवदास-पारो-चंद्रमुखी, वासू-सपना, श्रेयस-मिनू-शिरीन, दिग्या-सुरेखा, जोश्या-शिरोडकर .... या सगळ्या दुर्दैवी जीवांच्या प्रेमकथेचा शेवट गोड झाला असता का?

३. "दुश्मन और सौतन को तडपते देखिये !" जया भाभीने असा काही तांत्रिक मार्ग अवलंबला असता तर रेखा ताईचे काय झाले असते?  बंगाली बाबा भगवान श्रीकृष्णाच्या काळात असते तर त्यांना सोळा सहस्त्र क्लायंट्स आयते मिळाले असते का? 'माझ्या नवऱ्याची बायको' या सिरिअलमध्ये बंगाली बाबाचा एखादा ट्रॅक घुसडून ती अजून लांबवता येऊ शकेल का? भारत पाक युद्धात 'बाबा बंगाली बटालियन' या निमलष्करी दलाचा उपयोग आपले सरकार करू शकते का ? या जाहिराती वाचून प्रत्येक माणूस मनातल्या मनात एखादी दुश्मनवाली यादी बनवत असेल का?

४. नौकरी ना मिलना, कारोबार में नुकसान: छोट्या MBA कॉलेजेसमधील प्लेसमेंट कमिटी बंगाली बाबांना शरण जात असतील का? दिवाळखोर उद्योगपती बंगाली बाबांची बिजनेस कंसल्टंट म्हणून नेमणूक करत असतील का? विजय मल्ल्या, निरव मोदी, नरेश गोयल प्रभूतींना त्यांच्याच एखाद्या ट्रेनमधून प्रवास करण्याऱ्या कर्मचाऱ्याने बंगाली बाबांची शिफारस का नाही केली?

५. आणि या सगळ्या प्रॉब्लेम लिस्टमध्ये 'बॉस' या जटिल समस्येचा काहीच कसा उल्लेख नाही? सर्वज्ञात बंगाली बाबाला या समस्येची जाणीवच नसावी की बंगाली बाबा कधी ऑफिसमधेच गेला नाही म्हणून हा अनुल्लेख ? बॉस नावाचा प्राणी हा लोकल ट्रेनने नव्हे तर स्वतःच्या गाडीनेच प्रवास करतो अशी त्याची समजूत असावी का ? आणि जे बॉसेस लोकल ट्रेनने प्रवास करत असतील ते अशा जाहिराती वाचून स्वतःच्या जिवाची काळजी करत असतील का आणि करत असले तर माझा बॉस त्यात असेल का? (अहो बॉस लोकहो... भगवान से नही तो फिर बंगाली बाबा से तो डरिये !)

६. प्रॉब्लेम कुठलाही असो... घरबसल्या तुमचे २४ तासात समाधान .... बंगाली बाबांचा हा स्टॅंडर्ड टर्न-अराउंड टाईम  (TAT) आजच्या तारखेला ११ तासापर्यंत येऊन पोहोचलाय... या घरबसल्या डिलिव्हरी आणि सुधारित विक्रमी वेळेमागे नक्की कुठले पेटंटेड तंत्रज्ञान असावे? बंगाली बाबा ऑनलाईन पेमेंट स्वीकारतात का?

आता इतर जाहिरातींबद्दल बोलूया:

७. स्टेशनपासून फक्त अमुक मिनिट अंतरावर घर: या वेळेचे मोजमाप नक्की कसे करतात ? चालत, रिक्षाने की विमानाने ? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर अशी जाहिरात करून अजूनपर्यंत अस्तित्वात नसलेल्या दुनियेच्या टोकावरच्या गावातली घरे विकताना मुंबईतून तडीपार केलेल्या लोकांना विशेष सूट देत असतील का ? हाकेचे अंतर याचा अर्थ इथे मोबाईलवर नेटवर्क रेंज येणे असा होतो का ?

८. स्वतःची टुरिस्ट कार कर्ज घेऊन भाड्याने द्या आणि स्वतः मालक बना.... वर्क फ्रॉम होम - टायपिंग जॉब - घरबसल्या ५० हजार कमवा ... या अशा सगळ्या जाहिराती राष्ट्रीय रोजगार निर्माण योजनेचा भाग आहेत का ? कोणत्याही शिक्षणाची अट नाही... मग आपण एवढे का शिकलो मरायला ? दहावी नंतर असले करिअर पर्याय आपल्या पाल्यासाठी निवडून कॉलेज शिक्षणावरील अनावश्यक खर्च पालकांना टाळता येऊ शकेल का?

९. लोकल्समधील मराठी जाहिरातींमधले भाषांतर आणि इंग्लिश जाहिरातींमधले स्पेलिंग्स-व्याकरण तपासायला एखादी समिती का नेमू नये ? उदाहरणार्थ: आमच्या कंपनीला 'जुडा' आणि हजारो कमवा ! घट'स्फोटक' वधू वरांसाठी सुद्धा ! मराठी भाषा दिन साजरा करताना निदान एक दिवस या जाहिराती झाकून ठेवता येतील का ?

हे सगळे अनुत्तरित प्रश्न सोडवायला मला नक्कीच एखाद्या बाबा बंगालीकडे जावे लागेल असे दिसतेय !

तळटीप:
१. 'बवासीर क्लिनिक-भगेंद्र-कमजोरी'वाल्या जाहिरातींवरचे प्रश्न सेन्सॉर बोर्डाने कापल्यामुळे इथे अंतर्भूत करता येऊ शकले नाहीत... कृपया या विषयावरील स्वतःचे प्रश्न स्वतःकडेच ठेवा...
२. महाराष्ट्रीयन मुलींशी लग्न केलेल्या बंगाली पुरुषांना त्यांची मुले 'बाबा बंगाली' म्हणून हाक मारत असतील का असा प्रश्न मला नेहमी पडतो...  अशा निसर्गनिर्मित बंगाली बाबांना दुखवायचा माझा कुठलाही हेतू नाहीय...असल्यास निव्वळ योगायोग न समजता स्वतःच्या कर्माचे भोग समजावे... 

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.