प्रिय सल्लुदादा यांस,
सप्रेम नमस्कार !!
तुझी पहिली फिल्म "मैंने प्यार किया" (१९८९) बघितली तेव्हा अवघा सहा वर्षांचा होतो मी... चॉकलेट खाण्याच्या वयात बघितलेला पहिला चॉकलेट हीरो होतास तू... आज माझ्या डोक्यावरचे "wrapper" उडायला आले तरी तू अजुन चॉकलेट हीरोच आहेस...
बघता बघता किती वर्षे उलटून गेली ना सहज...त्याच हिशोबात तुझ्या गर्लफ्रेंड्सही तेवढ्याच झाल्या ना रे तुझ्या?? संगीता बिजलानी...सोमी अली... ऐश्वर्या...कतरिना... आणि आता झरीन... (कुणाचेही नाव यादीतून नजरचुकीने वगळले असल्यास क्षमस्व...चुकभुल द्यावी घ्यावी...) "गोरी गोरी पान...फुलासारखी छान...दादा मला एक वाहिनी आण" असे गाउन माझा कंठ सुजला...मात्र तू अजुन तसाच... "most eligible bachelor of Bollywood!!" कधी होणार रे तुझे लग्न?? तुझी आई तुझ्यापाठी लग्नाची भुणभुण नाही लावत?? "बेटे... कब लाओगे एक चाँद जैसी दुल्हन इस घर में ?? मेरी आँखे तरस गई हैं अपनी लाडली बहु का चेहरा देखने के लिए..." असे फिल्मी डायलॉग नाही ऐकवत का तुला? बरोबर रे... दहा लफडी करून झाल्यावर तिने सुद्धा वाट बघणे सोडून दिले असेल... आता या कॅसिनो (की कॅसिनोवा??) चा काटा कुठे थांबतोय हे तिने दैवावर सोपवले असेल बहुतेक... आणि तुमचे मोठे फिल्मी 'खान'दान... आमच्या सारख्या मध्यमवर्गीय घरात पंचविशी ओलांडली की आमचे चिंतातुर पालक दोरीवर सुकत घातलेल्या टॉवेलकडे अंतरपाट समजुन डोळे लावून बसतात...
बाकी काहीही म्हणा हां... तुझा मजबूत खांदा म्हणजे बॉलीवूडमध्ये येणारया नवीन पोरींसाठी लाँचपॅडच झालेय जणू... वाजत गाजत येतात... इतिहासजमा होतात... ती ऐश्वर्याची डुप्लीकेट स्नेहा उल्लाल... कुठे गायब झाली ते थिएटरच्या डोअरकीपरला सुद्धा समजले नाही...(काल कोणी तरी म्हणत होता की तिचे अभिषेक बच्चन बरोबर लग्न झाले म्हणून).... तुला माहितेय ???? फार पूर्वी विवेक वासवानी नावाचा एक भला सदगृहस्थ बॉलीवूडमध्ये होता...(तोच तो..."जोश" पिक्चर मध्ये "अपुन बोला" या गाण्यात प्रिया गिल ला व्हायोलिन शिकवणारा...) प्रत्येकाला मदत करून आता त्याचे स्वत:चे इतके वाईट दिवस आलेत... की कोणी स्पॉटबॉय सुद्धा त्याला ओळख दाखवायला तयार होत नाही... पण तुझे मात्र तसे नाही रे दादा... तुझी मदत पहिल्यापासूनच एकदम निवडक... ओळख मिळवून देण्यापासून ते अगदी पिक्चर कसे निवडावेत इथपर्यंत ...(ताजी विद्यार्थिनी : सोनाक्षी सिन्हा - शत्रुघ्न काकांची कन्या).... या कोवळ्या पोरींसाठी तू सदैव सारथ्याच्या भुमिकेतच असतो...अगदी अर्जुनासारखा... बरे... या मुलींचा 'गॉड'फादर तरी कसा म्हणावा तुला... लय 'गॉड'फ्रेंड आहेस बघ तू....
चिंकारा शिकार प्रकरण असो वा फूटपाथवरचा अपघात असो... तू प्रत्येक संकटाला निधडया (की उघडया??) छातीने सामोरे गेलास...शर्ट काढून अर्धनग्न नाचायच्या तुझ्या स्टाइलमुळे पोरी तुझ्यावर जाम फिदा झाल्या... इतक्या... की झाडून सगळी पोरे व्यायामशाळेत नाव नोंदवून आपले कपडे कमी वा तोकडे करायच्या नादी लागले... मी सुद्धा तुझ्यापासून प्रेरणा घेउन असाच प्रयोग एकदा केला होता... समोरच्या घरात राहणारया बावळट अंजुवर लाइन मारायला... गॅलरीमध्ये उभा राहून मी शर्ट काढायचा अवकाश... सिक्स पॅक abs'ent असलेले आणि खपाटीला गेलेले पोट पाहून... हाडाचा पिंजरा झालेली छाती बघून ती तिच्या घराच्या दारातच किंचाळून बेशुद्ध पडली...अर्थातच अख्ख्या चाळीमध्ये या किश्श्याची बोंबाबोंब झालीच... दुसरया दिवशी काही उत्साही कारट्यानी उपद्व्याप करून ठेवलाच... सकाळी उठून बघतो तर काय... बाहेर सुकत घातलेल्या माझ्या बनियानवर कोळशाने रेषा काढून अक्षरश: सांगाडा बनवून ठेवलेला....
असो...बरेच विषयांतर झाले... माफ कर सल्लूदादा...
तसा तुझा अभिनय बेताचाच... गंभीर प्रसंगात तू रडतोस की हसतोस हे मला न उलगडलेले कोडे आहे... 'हम दिल दे चुके सनम' मध्ये तू ठीक अभिनय केलास असा काही लोकांचा गैरसमज आहे अजुन... हल्ली तर तू कुठल्याही सिनेमात आपल्या दोन भावांबरोबरच असतोस... हे म्हणजे zoom चॅनेल बरोबर दूरदर्शन आणि राज्यसभा चॅनेल फ्री मिळण्यासारखेच आहे... "मैं और मिसेस खन्ना" मध्ये तर चक्क फसवणुक होती... पोस्टर तुझे आणि पिक्चरमध्ये तू पाहुणा कलाकार... पूर्ण २ तास त्या सोहेल खान ला सहन करावे लागले फुकटचे.... कशाला घेतोस गरीब बिचारया प्रेक्षकांचे शिव्याशाप ??? तुझ्या दोन्ही भावांना पडद्यामागे निर्मात्याच्या भुमिकेमधेच राहू दिलेस तर तुझे करिअर अजुन दीर्घकाळ चालेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही...
तुझा जास्त वेळ घेणार नाही मी...जाता जाता एक टिपीकल मध्यमवर्गीय सल्ला देइन तुला... आता चाळिशीमध्ये तरी स्थिरसावर हो... गाडी-बंगला तर आहेच तूझ्याकडे...लग्न कर... तेवढेच मिडीयाचे पोट भरेल ४-५ दिवस... तुला मुले होतील... ती मोठी झाल्यावर तू एखादा सिनेमा काढशील... अजुन काही स्टारपुत्र / स्टारकन्या आमच्या डोक्यावर अभिनेते / अभिनेत्री म्हणून थापले जातील... सगळे कसे सुरळीत होइल अगदी...
बघ तुला पटतेय का ते... तू बोलावले नाहीस तरी तुझ्या वरातीमध्ये नक्की नाचायला येइन मी...
कळावे...लोभ असावा...
तुझा हितचिंतक...
ता.क. तुला मराठी वाचता येते का ते मला माहीत नाही... आमीरदादा मराठी शिकायचा प्रयत्न करतोय असे कानावर पडले... तू सुद्धा कधी तरी शिकशील मराठी... या आशेवरच लिहिलेय पत्र...
वैधानिक इशारा: एखाद्याला काका म्हटले तर त्याची मुलगी ही माझी चुलतबहीण होत नाही... सोनाक्षी... कृपया मला दादा म्हणून हाक मारू नकोस...
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
2 comments:
khup sahi lihilays... maja ali wachun ekdum :)
agadi jakas hudkun kadliyas bag....:)
टिप्पणी पोस्ट करा