तिच्या गुलाबी गालावर खळया पडलेल्या आणि त्याचे गाल खोल खड्ड्यात धपकन पडलेले
तिने केसात जणू चंद्र माळलेला आणि त्याच्या कपाळावरचे चंद्रग्रहण कलेकलेने वाढलेले
डोळ्यात तिच्या चमके शरदाचे चांदणे आणि चश्म्याशिवाय त्याच्या डोळ्यांपुढे चमकती तारे
तिची शरीरयष्टी म्हणजे 'अधिक मास' आणि याचा देह म्हणजे वर्षात दुष्काळाचे महिने सारे
तरी त्याचे प्रेम होते तिच्यावर अजोड, जरी त्यांची जोडी दिसायला अगदी विजोड होती
तिचे त्याच्यावर प्रेम नसले म्हणून काय झाले, तिखट असली तरी त्याच्यासाठी ती गोड होती
तिची नजर आकाशातल्या चांदण्या मोजत आणि याचे लक्ष खिशातल्या चिल्लरकडे
पाय तिचे जमिनीपासून दोन फूट हवेत आणि हा मोजून पाउल टाकतानासुद्धा धडपडे
तिचे मत म्हणजे दगडावरची रेघ आणि त्याचे मत म्हणजे तिने पुसून टाकलेली पाटी
साधी सोपी बेरीज वजाबाकी होती तिची आणि तेच अवघड समीकरण होते त्याच्यासाठी
निर्णयासाठी विकल्प कधीच नव्हते त्याला, केलेली प्रत्येक गोष्ट एक तडजोड होती
आयुष्य म्हणजे एक पार्टी तिच्यासाठी, जणू काही अडथळयाविना भागदौड होती
तिच्यासाठी विश्व होते एक शून्य आणि त्याचे शुन्यातले विश्व तिने संपूर्ण व्यापलेले
त्याच्या ओळी तिच्यासाठी लिहिलेल्या आणि तिचे शब्द त्याच्या काळजात खुपलेले
तिच्या भावना म्हणजे एक गद्य-उतारा तर त्याच्या मनी हळूवार कवितेमधला मुक्तछंद
तिचे प्रेम म्हणजे "शास्त्रीय कारणे दया" आणि त्याचे प्रेम म्हणजे पुरवणीभर निबंध
तिच्यासाठी तो म्हणजे फक्त चवीत बदल, लोणच्यामधली जणू एक फोड होती
दुनियादारीचे नियम विसरलेला तो, त्याला फक्त तिच्या प्रेमाचीच ओढ होती...
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
1 comments:
Tilahi fakt tyachya premachich odh hoti,aahe ani rahil :)
टिप्पणी पोस्ट करा