(गोष्टीच्या शीर्षकातच वैधानिक इशारा आहे...आपले मनस्वास्थ्य बिघडल्यास लेखक जबाबदार राहणार नाही!)
बाळू वेंधळे ‘लहानपणी’जन्माला आला तोच भिंगाचा चष्मा घालून!! चाळीच्या १० बाय १० खोलीतल्या TV वर जशी चॅनेल्सची संख्या वाढत गेली तसा बाळूच्या चश्म्याचा नंबर सुद्धा वाढत गेला. त्याचे मित्र त्या चश्म्याचा वापर दुर्बीण म्हणून उन्हात धरून कापूस जाळायला करायचे आणि बिचारा बाळू होळी पेटावी तशी बेंबीच्या देठापासून बोंबा मारायचा. महिन्यातून एकदा तरी बाळूचा चष्मा फुटायचाच!!... अखेर त्याच्या बाबानी सततच्या खर्चाला कंटाळून सोडावॉटर बाटलीच्या काचेचा स्वस्त पर्याय वापरायला सुरुवात केली!!
बाळू आता मोठा (चश्म्याबरोबर) होउन कॉलेजात जाऊ लागला होता. बाळू येता जाता लहान मुले रांगेत उभे राहून “जादू SSS जादू” च्या चालीवर “बाळू SSS बाळू ” गाणे गाउन त्याचे स्वागत करायची. एकदा तर गम्मतच झाली होती. नेहमी सारखा बाळूचा चष्मा फुटला होता. पहाटे पहाटे बाळू ९ वाजता उठला तो तडक चाळीच्या संडासकडे धावत सुटला. गडबडीत दारातले टमरेल उचलायचे सोडून त्याने बाल्कनी मधली गुलाबाची कुंडी घेउन पळ काढला. साहेब काम करून आले. दारात उभा राहिल्यावर घरातले त्याच्याकड़े आ वासून बघतच राहिले. बाळूच्या हातात रिकामी कुंडी होती. घराचे माप ओलांडून बाळू नव्या नवरी सारखे दबकत दबकत घरात आला आणि मोरीपर्यंत मातीचा सडा पडला. बाळू पाठ'मोरा' झाला आणि दिसले ते बाळू (च्या चड्डी)चे माकडा सारखे लाल कुल्ले (लाजेने नाही झालेले !!) आणि गुलाबाचे रोपटे चड्डीतून बाहेर आलेले!! बाळू अंघोळ करून बाहेर आला आणि बाहेर दोरीवर राणे काकूंनी सुकत घातलेला बबलीचा पेटीकोट आपली बनियान म्हणून घातला. बाळूला त्या अवस्थेत बघितल्यावर काही लोकांची बाळूकडे बघण्याची नजर बदलली (आणि चष्मा फुटल्यामुळे बाळूला हा बदल समजलाच नाही). राणे काकुंनी तर त्या दिवसापासून स्वता:चे आणि बबलीचे कुठलेही कपडे बाल्कनी वाळत घालायचे सोडून दिले!!
बाळूची मित्रमंडळी तशी जास्त नसली तरी झंप्या तुकतुके नावाचा बालमित्र नेहमीच कामाला यायचा... (म्हणजे त्याला काम असले की बाळूकडे यायचा)... संध्याकाळी दोघांचा वेळ समोरच्या उच्चभ्रू सोसायटीमधल्या टंच पोरी बघण्यात जायचा...वरती झंप्याची मिजास एवढी की निर्लज्जपणे स्पष्टीकरण द्यायचा "आपल्या अंगणात हिरवळ नसली की समोरच्या उकिरडयावर चरायला जावे लागते भाऊ!!"... पाठ्य-पुस्तक वाचण्यापेक्षा हैदोस आणि Fresh Apple चे पारायण करण्यात जास्त धन्यता मानणारया झंप्याचे विचार आणि अपेक्षा सुद्धा तशाच होत्या... "बंध रेशमाचे" या मालिकेचा पहिला भाग त्याने काहीतरी चावट adult show असेल या एवढयाच अपेक्षेने बघितला होता... तर....बाळू-झंप्याचे कारनामे असेच चालु होते आणि अचानक एके दिवशी... चाळीत रेशमा गोंधळकर नावाची एक मुलगी (तिच्या आई-बाबा सकट) राहायला आली... पंकज विष्णुला comedy show चा judge बनवल्यावर तुम्हाला जेवढे आश्चर्य वाटेल त्यापेक्षा जास्त आश्चर्यचकित भाव दोघांच्या चेहरयावर होते तिला बघितल्यावर... चवळीच्या शेंगेसारखी तिची फिगर बघून झंप्या काहीतरी बोलणारच होता एवढ्यात जाड भिंगेतुन डोळे मिचकावत बाळू पचकलाच..."काय गुबगुबीत आहे ना अगदी गुड्डी मारुती सारखी...चालेल मला!!"
एवढे दिवस बाळू आणि झंप्या तिची ओळख कशी काढायची या विचारात मग्न असताना अचानक एके दिवशी चमत्कार झाला... बाळू दारात उभा होता आणि समोरून रेशमा येत होती... राणेकाकूनी नुकतेच कपडे धुवून उरलेले पाणी बाल्कनीमध्ये फेकले होते... आडनावाला जागत तिने गोंधळ घातलाच... पाय घसरून ती सरळ गाडीखालून skating करत जावे तसे बाळूच्या लुंगीखालून सरकत गेली... विश्वदर्शन झाल्यासारखे तिने किंकाळी फोडली... लुंगीने बाळूच्या कमरेपासून फारकत घेउन ती रेशमाच्या चेहरयावर "घूँघट' म्हणून स्थानापन्न झाली होती... डोळे उघडू की नको असा बराच विचार करून अखेर रेशमा उठली... घाईगडबडीत तिने आपली ओढणी बाळूला दिली आणि त्याची लुंगी गळयाभोवती लपेटून पळाली... बाळू तिची ओढणी कमरेभोवती गुंडाळून तसाच बाल्कनीमध्ये फिरत होता... त्याला तशा अवतारात बघून ज्यांना फक्त संशय होता त्यांना पक्की खात्री झाली...काही तासानी
रेशमाला आपली चुक उमगली आणि ती बाळूकडे गेली देवाणघेवाण करायला...अजूनही काय झाले याची खबर नसलेल्या बाळूचा तिला भेटल्याचा आनंद त्याच्या डोळ्यातून वाहून चश्म्याच्या पलीकडून ओसंडला होता... गणपती विसर्जन व्यतिरिक्त कधीही न नाचलेला बाळू आज आपले हात पाय वेडेवाकडे हलवून नाचत होता... (मुन्नी बदनाम गाण्यामध्ये सोनू सूदने मलायकाभोवती जो वेडा नाच केलाय त्यापेक्षा बाळू नक्कीच छान नाचतो असे काहीजणांचे मत होते!!)
तिच्याशी ओळख तर झाली होती...आता तिला पटवायचे कसे या विचारात असलेला बाळू आपल्या परम मित्र झंप्याकडे गेला... बाळूची लाइन कशी कट करायची याचा पक्का प्लान बनवलेल्या झंप्याला आयतीच संधी मिळाली... "मी तुला एक मस्तपैकी प्रेमाची चारोळी लिहून देतो...ती नक्कीच प्रभावित होइल"... त्याने लिहिलेल्या कवित्वाची प्रभावळ (की पत्रावळ??) घेउन बाळू रेशमाकडे गेला कवितावाचन करायला...
"तुझे सौंदर्य माझ्या डोळ्यांत न मावणारे
रोखुनी बघतोय तुला माझा चष्मा भिंगाचा...
तुझे महत्त्व असे माझ्या आयुष्यात एवढे
जेवढा फरक महत्त्वाचा व्याकरणात लिंगाचा..."
रेशमाची मती एव्हाना सुन्न झाली होती...
तिने बाळूला विचारले..."तू केलीस ही कविता??"
"हो"
"मला वाटले की तुझ्या भंपक 'झंप्या' मित्राने रचलीय ही महान कविता"
"का? असे का वाटले?"
"तुम्ही दोघे एकाच वर्गात आहात ना...दोघांची वैचारिक पातळी एकच दिसतेय"
"वर्गमित्र असलो म्हणून काय झाले... सुधीर भट आणि काखा खाजवून आपली मते TV वर मांडणारा महेश भट या दोघात काही फरक आहे की नाही आडनाव बंधू असले तरी??"
बाळूचे अगाध स्पष्टीकरण ऐकून रेशमाच्या क़पाळावरच्या आठयांचे जाळे आणखीच ठळक झाले...
"आवडली ना तुला माझी कविता?? आपण फिरायला जाउया का? तुला हवे असेल तर झंप्यासुद्धा येइल आपल्याबरोबर... शिवाजी पार्क चालेल??"
"नाही"
"मग कोतवाल उद्यान? सावरकर स्मारक?? दादर चौपाटी??? कबूतरखाना????"
ठिकाणे बदलली तरी रेशमाचे उत्तर "नाही"च होते... शेवटी ती वैतागुन म्हणाली..." अरे आपण तिघे म्हणजे जनार्दन लवंगारे-प्रदीप पटवर्धन-नूतन जयंत आहोत का....नाटकाची स्टोरी तीच ठेवून फक्त नावात बदल करून शो लावायला??" आणि ती तणतणत निघून गेली...
बिचारा बाळू...प्रभादेवी आणि माहिम ही जगाची दोन टोके आहेत अशी पक्की समजूत असलेला पक्का दादरकर होता तो... दूसरी ठिकाणे सुचलीच नाहीत त्याला...
रेशमाचे प्रेम मिळवण्यासाठी अशा बरयाच खस्ता खाऊन झाल्यावर बाळू परत एकदा झंप्याकडे मदत मागायला गेला...
"तू आता डायरेक्ट लवलेटर च लिहून टाक एकदम फुल टू..."
"अरे पण प्रेम पत्र पोहोचवणार कसे तिच्याकडे??"
"एक आयडिया आहे...एका पिवळ्या कागदावर प्रेम संदेश लिहूया... आणि ती सकाळी ज्यावेळी प्रात:विधीसाठी जाईल नेमक्या त्याच संडासात लवलेटर चिकटवून ठेवू"...
"पण मी तर ऐकलेय की गुलाबी कागद वापरतात प्रेम लिखित स्वरूपात व्यक्त करायला"...
"अरे स्थळ आणि वातावरण दोघांनाही साजेसा असेल हा रंग !!"...
"शी रे... Comedy Express चे जोक्स इथे नको मारुस...तुझे असले जोक्स ऐकण्यापेक्षा Comedy Express मधली सतीश पुळेकर आणि राजन ताम्हाणे यांची विनोदवीर म्हणून झालेली एंट्री मी आनंदाने स्विकारेन!!"...
प्लान तर एकदम जोखमीचा होता पण आपल्या अजब इश्क-खातर बाळू तयार झाला ही रिस्क घ्यायला...
दुसरया दिवशी झंप्याने आपले काम चोख बजावल्यावर बाळू संडासाबाहेर रांगेत उभा राहिला... आज तो बाकी सगळ्याना आपल्या पुढे जाऊ देत होता आपला नंबर सोडून...अहो पोटात नुसत्याच कळा काय...अगदी प्रसूतिकळा आल्या असत्या तरी तो निर्विकारपणे उभा राहिला असता रांगेत...
रेशमा दिसताच त्याने तिला आपला नंबर देऊन पुढे जाऊ दिले आणि म्हणाला... "एकदम डावीकडे जो आहे तिथेच जा... तुझ्यासाठी तिथे काहीतरी ख़ास आहे..."
"काय आहे तिथे ?"
"माझ्या मनातले!!..."
रेशमाने आपल्या मेंदूला ताण न देता पोटावरचा ताण लक्षात घेउन सरळ संडासाकडे धाव घेतली...
बाळू मनातल्या मनात म्हणाला "माझ्या प्रेमात किती अधीर झालीय ही बिचारी...!!"
तिकडे आत झंप्याने काय प्रयोग करून ठेवलाय याची कल्पना नव्हती बिचारया बाळूला...
रेशमाने दरवाज्याच्या आतल्या बाजुला बघितले...लिहिले होते "डावीकडे बघ"
तिने डावीकडे बघितले...लिहिले होते "उजवीकडे बघ"
तिने उजवीकडे बघितले...लिहिले होते "वरती बघ"
तिने वरती बघितले...लिहिले होते "मागे बघ"
तिने मागे बघितले....लिहिले होते "बघायला आलात की **यला...काम करा आपले गुपचुप!! "
तिकडे बाहेर बाळू अंदाज बांधत होता की रेशमाची काय प्रतिक्रया असेल आपल्या प्रेमाचा साक्षात्कार झाल्यावर... बाळू इतका खुशीत होता की पाठीमागे उभे असलेले मख्ख चेहरयाचे कदमकाका सुद्धा त्याला आज दिलीप ताहिल विनोदी प्रसंगात जेवढा हसेल तेवढे हसतमुख भासले... तेवढ्यात रेशमा पाय आपटत बाहेर आलीच... बाळूचे भरलेले टमरेल उचलून तिने जोरात ते बाळूच्या अंगावर भिरकावून दिले...परत एकदा तिने आपल्या आडनावाला जागत नेम चुकवलाच...सगळे पाणी बाळूच्या अंगावर आणि टमरेल मात्र थेट कदमकाकांच्या डोक्यावर जाऊन आदळल्यावर त्यांच्या डोक्याचा मुकुट बनून मिरवत होते... अचानक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने कदमकाकांचा तोल जाऊन (फक्त शरीराचा!!) ते पाठीमागे उभ्या असलेल्या राणेकाकूंवर पडले आणि जणू काही आपला विनयभंग झालाय अशी किंकाळी फोडून काकूंनी काकांच्या डोक्यावर मुष्टीप्रहार केला... परिणाम: ते टमरेल आता काकांच्या ग़ळयाचा ताईत बनून मिरवत होते...
झाल्या प्रसंगातून सावरून बाळूने जणू विश्वसुंदरीचा मुकुट घालावा तेवढ्या अलगदपणे ते टमरेल काढले आणि तो घराच्या दिशेने चालता झाला... भिजलेला झब्बा, तुटलेला डब्बा आणि समोर दारात उभा बाबा...
...........आणि बाळू चिरक्या रडवेल्या आवाजात म्हणाला.... "अब्बा.....डब्बा.....झब्बा !!!"
3 comments:
laiiiiii bahriiiiii
सुंदर विनोदी कथानक
🤣😂🤣 भट्टी जमलीय, भाग-२ येऊ दे लवकरच. टाईमपास १ नंतर टापा २ मधे दगडु कसा पराजुला जिंकतोच्या धरतीवर बाळु आनं रेशमाची एकतर्फी प्रणयकथा.
टिप्पणी पोस्ट करा