एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 1)

"भो***भे ***भ **भि ****भा ***"

सकाळी  सकाळी  या ओव्या  आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या दिशेने थेट आमच्या कर्णपटलावर येऊन आदळल्या...तेव्हाच मी ओळखले कि रविवारच्या मंगल प्रहरी 'पक्या' नावाचा कलियुगातला वासुदेव प्रकटला असेल ...कुमार सानू जसा आपले कोणतेही गाणे 'ह' च्या बाराखडीने सुरु करायचा; अगदी तसेच पक्या आपले कुठलेही वाक्य 'भ' या अक्षराने सुरु नाही झाले तर ती व्याकरणातली मोठी चूक मानायचा...
मी भल्या पहाटे 10 वाजता साखरझोपेतून उठून नुकताच " दुध...ब्रेड...अंडी...अमुक तमुक " अशी बायकोने दिलेली लांबलचक यादी घेऊन आणि मुखाने "अरे संसार संसार " हे (रड)गाणे गुणगुणत (?) सोसायटी बाहेर चाललो होतो...पक्याच्या मंगलाष्टकाला' आवर घालायच्या हेतूने त्याला नाइलाजाने हाक मारली मी...

"काय झाले रे पक्या... आज कुणाचा उद्धार करतोय ??"
"अरे हा कोळशेवाला भैया मा****.....आपल्या सोसायटीच्या कंपाउंडवर मुतत होता..."
"हळू बोल रे पक्या... आणि असले शब्द वापरू नये...लघुशंका म्हणावे.."
"कसली आलीय  लघुशंका .. कसलीही शंका न बाळगता मुततच होता साला (आमच्या नशिबाने शिव्यांची तीव्रता कमी झाली!!)...आपली बिल्डींग अशी आडबाजूला आहे म्हणून लोकांनी काय आपले सोसायटी कंपाउंड म्हणजे सार्वजनिक मुतारी समजावी का? उद्यापासून इथे कोणी मुतताना दिसला तर आमच्या घराच्या खिडकीतून माझ्या हाताला मिळेल ते फेकून मारेन मी!!...मग शेंडी तुटो वा पारंबी...एक घाव दोन तुकडे!!" (एवढे बोलून तो थांबला...बहुतेक त्याच्याकडच्या म्हणी संपल्या असाव्यात)
"अरे कशाला लोकांच्या 'मुळा'वर उठलाय तू ...या त्रासाची 'दुसरी बाजू' बघितलीस का तू कधी?"
"शी ...मला असले छंद नाहीत बुवा"
"नको ते अर्थ काढू नकोस रे...तूच जरा विचार करून बघ..आपल्या सोसायटीच्या झाडांना पाणी घालायला कधी माणूस ठेवला होता का आपण?..किती पैसे वाचले असतील अजून पर्यंत....हा ...आपल्या झाडाचे चिकू मात्र थोडेसे खारट लागतात ही  गोष्ट वेगळी!"
माझ्या या संधिसाधू हिशेबीपणाचे जराही कौतुक न  करता पक्या म्हणाला..
"तरी मी तुला सांगत होतो की 'पती सगळे उचापती" सारखी नाटके बघायला जाऊ नकोस म्हणून...पाठी लागलेला वाघ कसा घसरून पडला असले पिवळे जोक्स ऐकून तुझी विनोदबुद्धी सुद्धा तेवढीच खालावली आहे बरे !!"
(आता विषय भरकटायला लागला होता...उशिरा घरी गेलो तर तेवढीच थोडी कमी कामे करायला लागतील या विचाराने मी सुद्धा तिथे रेंगाळलो..)
"पक्या ...आजकाल अशीच नाटके हवी असतात प्रेक्षकांना... बिचारे निर्माते तरी काय करणार?"
"लोकांना काय आवडेल त्याचा नेम नाही रे ..त्या दिवशी एका मैत्रिणीने फेसबुकवर अपडेट केले - 'श्रेष्ठ संगीतकार अनिल मोहिलेजी आपल्याला सोडून गेले !!' आणि या कमेंटला 100 पोरांचे लाईक्स... म्हणजे काय समजायचे आपण ? ही दुखद बातमी लोकांना आवडली की ती पोरगी?"
(पक्या रागाच्या भरात कुठल्याही विषयाला हात घालू शकतो... यात त्याला कसले विषयसुख मिळते देवास ठाऊक...)
"कशाला लोकाना नावे ठेवतोस...सोडून द्यायचे ------"
माझे वाक्य अर्धवट तोडून पक्या म्हणाला "अरे लोकच वाटेल ती नावे ठेवतात आपल्या मुलांची...त्या दिवशीच एका मुलाचे नाव ऐकले मी...मिल्केश!! बाप दुधवाला असला म्हणून काय झाले ? उद्या एखादा सेल्समन आपल्या मुलीचे नाव 'माल-विका' ठेवेल आणि एखादा कोळी 'मत्स्यगंधा' !!"
"तुझे नाव 'जमदग्नी' का नाही रे ठेवले तुझ्या आई-बाबांनी?"
माझ्या खवचट प्रश्नाला सोयीस्कररीत्या बगल देत पक्या माझ्यावर बरसला...
"Pink Floyd ची गाणी कधी ऐकलीय का रे तू?"
"नाही मित्रा...मला एकतर इंग्लिश गाणी समजत नाही... एकच गाणे मला अजून पर्यंत समजले ते सुद्धा त्यात फक्त "ब्राझील" हा एकच शब्द होता म्हणून... मराठीमध्ये सुद्धा "इथेच टाका तंबू' हेच गाणे आपल्या आयुष्याला समर्पक वाटते.. ऑफिस मध्ये गेल्यावर ते 'इथेच टाका बंबू ' असे होते हे मात्र खरे !"
"जाऊ दे...तुझ्याबरोबर बोलत राहून कशाला माझा वेळ वाया घालवतोय मी ...तुला नाही समजणार रे या प्रचंड क्रोधरुपी ज्वालामुखीचे खरे कारण?" (मला लगेच चाचा चौधरी कॉमिक्स मधले  'साबू को जब गुस्सा आता है तब ...'हे वाक्य आठवले) असे बोलून पक्या तणतणत निघून गेला...
पक्या रागात बोलताना त्याचे आविर्भाव म्हणजे बालनाट्यातल्या कलाकारांसारखे हातवारे अभिनय असतो.. त्यात सुद्धा सेहवाग जसा पाय न हलवता फलंदाजी करतो तसाच हा सुद्धा चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता फक्त हात उडवत वैतागतो...


अरेच्या...एक गोष्ट माझ्या आता लक्षात आली...ती म्हणजे...हा पक्या कोण म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल...अहो पक्या उर्फ प्रकाश  भडके... म्हणजे आमच्याच बिल्डींगमध्ये राहणारा माझा बालमित्र... आता हा एवढा रागीट का असा प्रश्न विचारू नका... याचे अख्खे भडके कुटुंबच अति तापट आणि मुलखाचे भांडखोर (मी त्याचा मित्र म्हणून मला थोडी सवलत मिळते...त्यांच्या शिव्या-शापांचे धनी होणे आपल्या नशिबी नाही यातच माझे परम-भाग्य) ...तर काय सांगत होतो मी.. हा...खालच्या मजल्यावर राहणारा जोश्यांचा वात्रट मुलगा यांच्या सततच्या भांडणाला एवढा कंटाळला...की भडकेंच्या घराच्या दारावर "लोकसभा" म्हणून बोर्ड लावून पळून गेला (तिथेच थांबायची हिम्मत आहे कुणात?).. तर आमचे पक्या साहेब त्या कार्ट्याच्या  घरी जाऊन खुर्च्यांची तोडफोड करून आले... असे म्हणतात की हा खासदार तिकडे माईक शोधत होता फेकायला...जेव्हा जोश्यांच्या आजीबाई या वयातला उरलासुरला धीर एकवटून म्हणाल्या "अरे इथे कोणी माईक नावाचा मुलगा नाही राहत...हे जोश्यांचे घर आहे!!" तेव्हा हा दंगलखोर कर्फ्यू लागल्यासारखा गायब झाला तिकडून...


तर अशा या माथेफिरू पक्याला पोरींचा जाम तिटकारा....अंह ...अजिबात गैरसमज करून नाही घ्यायचा मंडळी...खरे म्हणजे तळमजल्यावर राहणाऱ्या गोरे कुटुंबातल्या जुळ्या मुलींवर या पक्याचे प्रेम होते...त्या दोघींमधली नक्की कुठली मुलगी आवडायची ते त्याला सुद्धा ठाऊक नव्हते...पण दोघींपैकी एखादी तरी आपल्याला पटेल अशी भाबडी आशा होती त्याला...त्याच्या या प्रेम-प्रकरणाला आम्ही मुले "पायथा-गोरीस" चे प्रमेय असे नाव ठेवले होते (म्हणजे तळमजल्यावरच्या गोरेंच्या मुलींचे प्रेम-गणित)... पण हे समीकरण पक्याला कधीच सुटले नाही... या जुळ्या पोरींचे 'सयामी' प्रेम समोरच्या सोसायटी देशपांडेंच्या मरतुकड्या राजूवर होते... ही बातमी मिळाल्यावर पक्याचा प्रेमावरचा विश्वास जो उडाला तो अगदी कायमचाच! आणि आता याचे लग्न जमवताना त्याच्या आईबाबांची पुरती दमछाक झाली होती..एवढी की...तांदूळ निवडताना अचानक भडके काकू अक्षता टाकल्यासारखे आविर्भाव करायच्या कधीकधी...खरेच केवढी काळजी करतात आजकालचे पालक आपल्या मुलांच्या लग्नाची !!


तर एके संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आल्यावर माझ्या बायकोने एक धक्कादायक बातमी दिली... "अहो  प्रकाश भडकेंच्या मातोश्री आल्या होत्या आपल्याकडे...घरात फक्त कथ्थक करायचे बाकी ठेवले होते त्यांनी"
"कोण प्रकाश भडके?"
" अहो तुमचा मित्र पक्या...त्याचे लग्न ठरलेय म्हणे!"
माझ्या हातातला ग्लास (पाण्याचा...म्हणजे पाणी भरलेला!) या धक्क्याने खाली पडला (हल्ली खूपच हिंदी चित्रपट बघतो मी)...
कंप सुटलेल्या आवाजात बायकोला मी विचारले (तसे अजूनपर्यंत मोठया आवाजात मी माझ्या बायकोला कधी काही विचारले नाही...दुसऱ्यांच्या सुद्धा नाही...आईशपथ!) "कोण आहे ती सहनशील मुलगी?"


बायको उत्तरली..."प्रियांका पाकळे!!"

मी जागच्या जागीच कोसळलो (माझ्या छोट्याशा घरात ऐसपैस कोसळायलासुद्धा जागा नव्हती म्हणून!)

............................... 




(क्रमश :)
................................
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 2): http://belekar.blogspot.in/2012/07/2.html

4 comments:

  1. Pradnya म्हणाले...:

    mast lekhan shaily...awadla...

  1. Yogesh म्हणाले...:

    धन्यवाद...प्रज्ञा आणि आदित्य !!

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.