एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 2)

एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 1): http://belekar.blogspot.in/2012/07/1.html
--------------------------------------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 2)
--------------------------------------------


"प्रियांका पाकळे....उर्फ...पिंकी पकेली!!"

आता तर माझ्या तोंडातून फक्त फेस यायचाच बाकी राहिला होता... दैवाचा क्रूर विनोद असे काही म्हणतात ते याहून काही वेगळे नसेल अशी पक्की खात्री झाली माझी... चिरंजीव पक्या भडके आणि चि.सौ.कां. पिंकी पकेली यांचा शुभविवाह ??? या दुनियेचा शेवट 2012 मध्ये होणार या भंपक बातमीवर सुद्धा माझा विश्वास बसला त्या दिवशी ...

तर ही पिंकी पकेली म्हणजे बाजूच्या कॉलनीमधली प्रियांका पाकळे... माझ्या दुर्दैवाने आम्ही दोघे एकाच कॉलेजमधून graduate झालो...माझ्या एका मैत्रिणीने पिंकीची आणि माझी ओळख करून दिली होती... मागाहून मला कळले की...त्या मैत्रिणीने काही पूर्ववैमनस्यातून मला अद्दल घडवायला असा डाव रचला होता  ...पण म्हणून का कुणी असा बदला घ्यावा?? काही माणुसकी आहे की  नाही शिल्लक...पिंकी पकेली म्हणजे काय प्रकरण आहे याची मला थोडी जरी पूर्वकल्पना असती तर त्या मैत्रिणीच्या सात पिढ्यांबरोबर मी चिमुटभरसुद्धा वैर पत्करले नसते...

आता तुम्ही म्हणाल एवढे काय विचित्र होते त्या मुलीमध्ये ....अहो गुणीजन... व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचा  दुसरा भाग निघाला असता तर पहिल्या व्यक्तीचित्राचा मान फक्त हिलाच मिळाला असता...

पिंकी एवढी जगप्रसिद्ध आहे सगळीकडे...की  तिला बघताच लहान मुले गाणे गायला सुरुवात करतात..."आयी पिंकी पकेली...इतनी थकेली...सबको पकाने आयी!"...खरोखर..तिच्या इतकी पकाऊ, आळशी आणि सदानकदा थकलेली मुलगी मी कुठेच आणि कधीच बघितली नव्हती...देवाने तो अत्याचार माझ्या कॉलेजजीवनात घडवून आणला... तिच्या आळशीपणाबद्दलच्या दंतकथा इतिहासातसुद्धा प्रचलित होत्या.. असे म्हणतात की पिंकी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती अजिबात रडली नाही...कारण आल्या आल्या तिने सर्वप्रथम जांभई दिली होती...सुखवस्तू घरातल्या सगळ्या सोयी उपभोगुन सुद्धा तिचा चेहरा नेहमी इतका  पडलेला आणि रडवेला असतो की जणू काही हिला लहानपणी दुधाची बाटली देण्याऐवजी तिच्या जन्मदात्यांनी चुकून एरंडेल तेलाची बाटली तिच्या तोंडी दिली असावी... जेवायला तोंड उघडावे लागते म्हणून तिला जेवणाचा इतका कंटाळा की... जेव्हा जेव्हा तिला जांभई यायची तेव्हा तेव्हा तिची आई तिला घास भरवायची (आणि तो घास गिळायला सुद्धा तिच्या जीवावर यायचे...पाठीत धम्मकलाडू मिळाल्यावरच तो घास आत ढकलला जायचा) "आयते गिळायला मिळणे" हे सुद्धा किती कष्टप्रद आहे याची बिचारीला कल्पना सुद्धा करवत नव्हती कधी... एकदा तर कमालच झाली...तिला एवढी मोठी जांभई आली की  परत तोंड झाकायचा सुद्धा तिला कंटाळा आला...शेवटी तिचे नाक दाबून तोंड बंद करावे लागले (नाक दाबल्यावर तोंड उघडते हा वाक्प्रचार त्यादिवशीच संपुष्टात आला!)


तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा तिचे किस्से मोठ्या चवीने चघळले जातात...एकदा तिच्या कम्प्युटर स्क्रीन वर एक माशी बसली होती...तिला हाकलवायला हात उचलणे पिंकीला एवढे त्रासदायक वाटले की ती माउसचा कर्सर त्या माशीवर क्लिक करत होती!!...तिला येणारे फोन कॉल्ससुद्धा अर्धवट कट व्ह्यायचे कारण ही बया फोन उचलून जांभई संपवून हेलोsssssss  बोलेपर्यंत समोरच्या माणसाचा प्राण गेलेला असायचा...


तर अशी ही  पिंकी पकेली !


मागच्याच आठवड्यात तिला भेटायचा दैवदुर्विलासयोग आला होता... तिने एकदा माझ्याकडून उधार घेतलले 10 रुपये मला परत मिळणार होते आणि या तुम्हाला शुल्लक वाटू शकणाऱ्या रकमेसाठी मी माझ्या जीवावर सुद्धा खेळू शकलो असतो...म्हणूनच त्या दिवशी पिंकीला कॉलनीच्या कोपऱ्यावर भेटलो ...
"Hi पिंकी !"
उत्तरादाखल तिने फक्त एक जांभई दिली..
"10 रुपये आणलेस का?"
"एवढ्याशा रकमेसाठी तू एवढी तंगडतोड केलीस? (मी तर फक्त एक रस्ता क्रॉस केला होता... जे तिच्यासाठी मैलभर अंतर होते) 
"अग मी तर 'दिल' पिक्चर मधल्या अनुपम खेरचा सुद्धा बाप आहे...पैसे दे माझे अगोदर"
"शी...तू चहा मध्ये पडलेली माशीसुद्धा सोडत नाहीस?"
आता एवढे भेटलोच आहोत तर इकडतिकडच्या गप्पा करणे भाग असते...म्हणून तिने उधार परत केल्यावर सुद्धा मी आमचे संभाषण पुढे चालू ठेवले..
"मग काय करणार या वीकएंड ला?"
"काही नाही (जांभई) कोण ते घराबाहेर पडून मॉल/मल्टीप्लेक्स/पिकनिकला जाणार...त्यापेक्षा घरात मस्त झोपून राहते मी...पण मला कधी कधी झोपायचा सुद्धा कंटाळा येतो..."
मी: (तुला कंटाळा यायचा सुद्धा कंटाळा येत असेल ग बाई...) अग मग कांदेपोहे प्रोग्राम करायचा वीकएंड ला... मस्त टाईमपास होईल.."
"शी बाई...कोण करेल ते लग्न आणि संसार...(जांभई)...किती कंटाळवाणे आहे ते सगळे!!"
मी: (भवाने...तुझ्या आईबाबांनी कंटाळा केला असता तर तू सुद्धा आली नसतीस या दुनियेमध्ये!) तू मेडिकल साईडला का नाही गेलीस ग...निद्रानाश या रोगावर तू रामबाण ईलाज करू शकली असतीस... ते सुद्धा फक्त पेशंटबरोबर बोलून...कुठलेही औषध न देता..!"
कुठलेही उत्तर न देता ती तशीच निघून गेली...तिला राग तर नक्कीच आला नसेल...बहुतेक माझ्या खोचक बोलण्याचा कंटाळा आला असेल !!
पण तेव्हा मात्र मी ठरवले...की पुढे जेव्हा कधी तिला भेटेन तेव्हा Red Bull प्यायल्याशिवाय असे धाडस करायचे नाही...तिच्याबरोबर न झोपता बोलायचे म्हणजे...सॉरी सॉरी...(तुम्ही सुद्धा दादा कोंडकेंचे चाहते आहात का?) जागे राहून तिच्या बरोबर बोलायचे म्हणजे एक अग्निदिव्यच !


मला एकच गहन प्रश्न पडला होता की पक्या आणि पिंकी पकेली अखेर लग्नाला तयार झालेच कसे... बहुतेक लग्नाची भुणभुण लावणाऱ्या आईबाबांवर 'रागावून' पक्या लग्नाला हो म्हणाला असेल आणि पिंकीने 'कंटाळून' ग्रीन सिग्नल दिला असेल... काही का  असेना....एकदाचे काय ते दोघांचे लग्न निर्वेध पार पडले हाच जगत-विधात्याचा चमत्कार मानायचा!!


या दोन टोकाच्या व्यक्तिमत्वांचा संसार किती मनोरंजक होईल याचीच मला उत्सुकता लागून राहिली होती!




-----------------
(क्रमश:)
-----------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 3): http://belekar.blogspot.in/2012/07/3.html

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.