रविवार, २९ जुलै, २०१२ |
2
comments
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 1): http://belekar.blogspot.in/2012/07/1.html
--------------------------------------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 2): http://belekar.blogspot.in/2012/07/2.html
--------------------------------------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 3): http://belekar.blogspot.in/2012/07/3.html
--------------------------------------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 4):
--------------------------------------------
कारण त्या दिवशी अचानक पिंकी भाजी मार्केट मध्ये दिसली...अर्थात...माझ्या बायकोने मला नेहमीप्रमाणे भाजी आणण्याच्या मोहिमेवर रवाना केले होते हे सांगणे न लगे...
"काय वहिनी...आज इथे कुठे वाट चुकलात?"
"चेष्टा करू नका हो भावोजी...पहिलांद्याच इथे आले म्हणून काय झाले...शिकेन मी हळूहळू..(जांभई)"
"काय शिकणार? भाजी बनवायला? मला बनवू नका वहिनी!"
"अहो..भाजी विकत घ्यायला म्हणतेय मी...आज आमच्या ह्यांचे पोट दुखतेय फार..."
"अरे वा....गोड बातमी !! अभिनंदन! कितवा महिना? पक्याने कमालच केली म्हणायची!"
"इश्श...तुम्ही खूपच मस्करी करता बुवा...आणि मी कसले जेवण बनवतेय...डोंबल !...मला बाई फार कंटाळा येतो! (जांभई)"
(छान...पक्याला सुद्धा तुझा कंटाळा आला असेल ग बाई !)
"पक्याचे पोट दुखतेय? छे हो...दहा माणसांचे जेवण पचवणारा बकासुर आहे तो...उगीच थाप मारत असेल तो भाजी आणायचे टाळायला...शाळेतली युक्ती परत नव्याने वापरायला काढलेली दिसतेय लेकाने..."
"नाही हो भावोजी... आज त्यांनी चुकून ताजे अन्न खाल्ले...तेवढेच निमित्त झाले बघा.."
"तुम्ही चुकताय वहिनी...शिळे अन्न म्हणायचेय का तुम्हाला?"
"ताजे अन्नच म्हणाले मी... त्याचे काय झाले...ती एक लांबलचक गोष्ट आहे (आता मी एक मोठी जांभई दिली!) लग्न झाल्यानंतर आम्ही वेगळे राहायला लागलो...आणि जेवणाच्या नावाने माझी बोंब होती (लहानपणापासूनच!)...तरी आमचे सुदैव की लग्नाच्या रुखवातात माझ्या माहेरच्यांनी 'मॅगी आणि 101 रेसिपीज' पुस्तक ठेवले होते...त्यावरच यांनी काही महिने कसाबसा तग धरून ठेवला होता...पण नंतर रोज मॅगी खाऊन ते इतके वैतागले की..संतप्त मुद्रेत त्यांचे केस सुद्धा मॅगी नुडल्स सारखे दिसायला लागले...मग यांनीच एक बाई ठेवली..(जांभई)"
"लग्न झालेले असताना पक्या ने बाई ठेवली?? हद्दच पार केली की हो! आणि हे सांगताना तुम्हाला चक्क जांभई येतेय?"
"अहो स्वयंपाक बनवायला बाई ठेवली!...आणि या कामवाल्या बाईंचे इतके नखरे असतात म्हणून सांगू तुम्हाला.."
मी मनात: (नखरे तर सगळ्यांच बायांचे असतात बाईसाहेब!)
तिने आपले म्हणणे चालूच ठेवले...माझी नजर रस्त्यावर कुठे कडेला झोपायला रिकामी जागा दिसते का ते शोधायला लागली...
"सारख्या रजा हव्यात या बायांना...आणि तिने एके दिवशी दांडी मारली तर आमच्या जेवणाचे काय? उगीच जेवण बनवायची रिस्क नको म्हणून आम्ही आज बनवलेलं जेवण उद्या खायला सुरुवात केली...अशा रीतीने शिळे अन्न खायची सवयच लागून गेली आम्हाला...आणि आज यांनी सगळा घोळ घालून ठेवला...चुकून नुकते बनवलेले ताजेताजे गरम अन्न खाल्ले हो त्यांनी...यांच्या नाजूक पोटाला ते सहन झाले नाही..(जांभई)"
एव्हाना माझ्या लक्षात आले होते की बोलता बोलता तिने भाज्यांच्या सगळ्या पिशव्या माझ्या हातात सोपवल्या होत्या...तिने मोठ्या शिताफीने तिचे पैशांचे पाकीट स्वत:कडे ठेवायचे कष्ट घेतले होते ...मी आपला रामू गड्यासारखा तिचे सगळे सामान तिच्या घरापर्यंत पोहोचवून आलो...खांद्यावर फक्त एक रुमाल टाकायचे तेवढे फक्त बाकी राहिले होते...पक्याचे हाल बघवले नसते म्हणून त्यांच्या घरात जायचे टाळले मी...
हल्लीच मी पक्या आणि पिंकी दोघांना कुठेतरी घाईघाईत जाताना बघितले...आणि नीट निरीक्षण केल्यावर मला दिसले की पक्याच्या खंगलेल्या पोटावर एका कांगारू पिशवीत एक छोटे बाळ कोंबले होते...त्या पिल्लूचे मॅगी नुडल्स सारखे केस बघून लगेच समजले की हे नक्कीच स्वयंपाकवाली बाई यायच्या अगोदरचे प्रॉडक्ट असावे...त्यांची लगबग बघून मी सुद्धा त्यांना हाक मारायच्या भानगडीत पडलो नाही...
पक्या आणि पिंकी बरेच दिवस कुठे दिसले नाहीत असा विचार करतच मी कापडी पिशवी खांद्यावर लटकवून बाजारात चाललो होतो....तेवढ्यात भडके काकूंनी मला हाक मारली...
"काय रे मुला...(बहुतेक त्या माझे नाव विसरल्या असाव्यात..) बऱ्याच वर्षाने दिसलास तू ..."
"हो काकू...तुम्ही कशा आहात...पक्या आणि वहिनींची काय खबरबात?"
"मला कसली धाड भरलीय रे...पक्या आणि भामिनी...चाललाय संसार त्यांचा..."
"कोण भामिनी?"
"अरे म्हणजे तुझी वहिनी... लग्नानंतर तिचे नाव बदलले की पक्याने (चला...म्हणजे इथे सुद्धा पक्याने 'भ' अक्षर सोडले नाही!) हल्लीच दोघांना त्यांच्या बिल्डींगमध्ये आदर्श जोडप्याचा पुरस्कार मिळाला!"
"अरे वा....फार छानच चाललेय की म्हणजे..."
"कसला बोडक्याचा पुरस्कार?" काकू कडाडल्या..."लग्न झाल्यावर...तिला नेहमी येणाऱ्या कंटाळ्याचा त्याला राग यायचा ...आणि त्याच्या प्रचंड रागाचा तिला कंटाळा यायचा...पक्या संतापाच्या भरात तिला काहीही बोलला की ती प्रत्युत्तरादाखल तोंड उघडायची ते सुद्धा फक्त जांभई दयायला...काही दिवसात पक्याने सुद्धा तिच्यावर रागवायचे सोडून दिले...आमच्या घरात प्रत्येक गोष्टीवर हमरीतुमरीवर यायची प्रत्येकाला सवय... समोरून शत्रुपक्षाची काहीच चाल नसेल तर ती लढाई म्हणजे शेंबडासारखी बुळबुळीतच म्हणायची...म्हणून पक्या एकटाच बाहेर फिरतो...भाजी घेताना घासाघीस करण्याच्या....लोकल मधून फिरण्याच्या निमित्ताने तेवढेच त्याला भांडायला मिळते...त्यामुळे घरात नवरा बायकोचा अगदी अबोल संसार चालू असतो...लोकांना वाटते भांडण नाही म्हणजे संसार गोडीगुलाबीत चाललाय मस्त ...घरातल्या प्रत्येक कामाला मोलकरीण आहे ...आणि या दोघांचे छोटे पोरगे आपल्या आईबापांचे विरुद्ध दिशेने फिरलेली तोंडे बघून स्वत:ची कामे स्वत:च करायला शिकलाय या लहानशा वयात...या वेगाने तो वयाच्या पाचव्याच वर्षी शिक्षण संपवून नोकरीधंदयाला लागेल असे दिसतेय...गर्भारपणाचे कष्ट नकोत म्हणून सरोगेट मदरचे खूळ डोक्यात घालून घेतले होते सुनेने...बरे झाले तिच्याच आईने तिच्या श्रीमुखात भडकवली ते..."
काकुंचे डोळे पाणावलेले दिसले...मला काय बोलायचे तेच सुचेना...
"येणाऱ्या पिढींचे काही खरे नाही रे लेका...बालविवाह पासून...आंतरजातीय विवाह...ते समलिंगी विवाह...आणि आता काय ते तुमचे नवीन फॅड....लिव्ह-एन-रिलेशनशिप...हल्ली म्हणे त्याच्यात सुद्धा वेगळे झाल्यावर पोटगी मिळते म्हणे....काय चाललेय तेच कळत नाही रे आम्हा जुनाट लोकांना...लग्न-संस्थेचा थोडा तरी मान ठेवा रे पोरांनो..." असे म्हणत काकूंनी पदराने आपले डोळे हळूच पुसले...
नेहमी पदर खोचून भांडण करायला सरसावण्याऱ्या काकुंचे हे वेगळे रूप बघून गलबलून आले मला...
काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलून गेलो..."अहो चालायचेच काकू...हल्लीच्या मुली ऑफिस...करिअरच्या गडबडीत खुप दमलेल्या असतात घरी येऊन....."
काकू परत एकदा खेकसल्या माझ्या अंगावर..."कप्पाळ माझे!!...कसले करिअर या सटवीचे...ना काळजी ना धोका...आणि खाऊन पडलाय बोका ....मारी बिस्कीटावर टाचणीने भोके पाडायचे काम करत असेल ही ऑफिसमध्ये जाऊन...बाकी कुठले काम माझ्या सुनेला झेपणार आहे म्हणताय...आणि आमचा दिवटा सुद्धा काही कमीचा नाहीय...प्रत्येक गोष्टीवरून डोक्यात राख घालून फिरतो तांडव करीत.." काकू स्वत:शीच भांडत आपल्या वाटेल्या लागल्या..
काकूंना परत एकदा नॉर्मल झालेले बघून माझ्या जीवात जीव आला... शशिकलाने जर निरुपा रॉयची वात्सल्यपूर्ण भूमिका हिरावून घेतली असती तर ते लोकांना पचले असते का...
मला मात्र पक्या आणि पिंकीच्या मुलाचे पुढे काय होणार याची काळजी पोखरू लागली...
(एका लग्नाची पहिलीच गोष्ट तूर्तास तरी इथेच समाप्त!!)
2 comments:
मारी बिस्कीटावर टाचणीने भोके पाडायचे काम करत असेल plus 1
कथा छान लिहिली आहे.
पुलेशु
Thanks पुलेशु
टिप्पणी पोस्ट करा