प्रिय शिरीष कणेकरजी ...

प्रिय शिरीष कणेकरजी ...

स.न.वि.वि.

पत्रास कारण की.... नुकतेच तुमचे 'आंबट-चिंबट' पुस्तक वाचले... (अमुक लेखकाचे पुस्तक वाचून 'टाकले' किंवा तमुक लेखक 'संपवला' असले शब्दप्रयोग मी करीत नाही...) आणि लगेचच तुम्हाला पत्र लिहावयास बसलो... 

वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असूनसुद्धा कला शाखेत शिकत असल्यासारखा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जेव्हा मी दिवसभर पडून असायचो तेव्हापासून मी तुमची पुस्तके फुकट वाचत आलोय...हल्लीच काही महिन्यांपूर्वी मी तुमची २ पुस्तके विकत घेऊन वाचली तेव्हा यातली नेमकी किती रॉयल्टी तुमच्या खिशात जाईल असा सुप्त व्यवहारी विचार मनात चमकून गेलाच... तुमच्या पुस्तकाचा उपयोग मी आमच्या घरात (माझ्या) बायको पासून तोंड लपवून तिच्यावर हसण्यासाठी करतो असा तिचा गैरसमज झालाय... "विनाश काले विनोद बुद्धी" असे मला सिद्ध करायचे नसल्याने मी हल्ली तुमचे पुस्तक लोकल प्रवास करताना वाचतो... बाकीचे सगळे लोक आपापल्या मोबाईल मध्ये पायरेटेड चित्रपट बघत असताना मी मात्र वेड्यासारखा हसत असतो तुमचे पुस्तक वाचत... तेवढीच अनुकंपा तत्वावर लगेच बसायला जागा मिळते मला...

मालेगावात व्यतीत केलेल्या शालेय जीवनात तुम्ही शाळेत जे काही कागदावर खरडून फेकले असेल त्या साहित्यावर अजूनही मालेगावची समांतर फिल्म इंडस्ट्री तग धरून असेल असा माझा विश्वास आहे ... मालेगावला जसे तुम्ही चित्रपट बघत मोकाट सुटायचे तसेच माझ्यावरचे चित्रपट संस्कार माझ्या गावी म्हणजे कणकवलीमध्ये झाले...पंख्याची आलिशान सोय असूनसुद्धा उन्हाळ्यात रटरटीत उकडलेल्या तिकडच्या थिएटरमध्ये किंवा २ रुपये तिकीट असलेल्या व्हिडिओ सेंटरमध्ये जे लागतील ते पिक्चर मी बघितलेले आहेत... अगदी किशोरी शहाणेचा बॉलिवूड मधला पहिला चित्रपट 'बॉम्ब ब्लास्ट' सुद्धा... शिवजयंतीला रात्री कणकवलीच्या रस्त्यावर पडद्यावर लावलेला '१०० डेज' बघताना रस्त्याच्या कोपऱ्यावरून उठून हळूच कोणाला न समजेल अशा पद्धतीने लोकांच्या घोळक्यामध्ये बसून उरलेला पिक्चर पाहिला मी... (त्याच रस्त्यावर मी 'बाजीगर' सुद्धा बघितलेला... ) मी आणि माझा भाऊ 'खुदा गवाह' हा सिनेमा दुपारच्या रणरणत्या उन्हात सायकलवरून बघायला गेलेलो आणि विडिओ सेंटरमध्ये फक्त आम्हां दोघा प्रेक्षकांच्या उपस्थितीत तो शो रद्द झाल्याने आमचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होण्यापासून प्रत्यक्ष खुदाने आम्हाला वाचवले... त्यानंतर संजय कपूर (डबल रोल!) -मनीषा-ममता यांचा 'छुपा रुस्तम' थिएटरमध्ये तिकीट काढून बघितल्यावर मी चित्रपट संन्यास घेतला होता...तेव्हापासून 'रुस्तम' या शब्दाची एवढी धास्ती घेतली की अलीकडचा अक्षय कुमारचा 'रुस्तम' सुद्धा बघितला नाही मी...  मात्र मायकेल फेल्प्स आणि मार्टिना हिंगीस यांच्यासारखी माझी चित्रपटनिवृत्ती रद्द करून मी परत चित्रपट प्रवाहात आलो तेव्हा माझ्या नशिबी 'दिल बोले हडीप्पा' सारखे कपाळ करंटे पिक्चर वाट्याला आले... एके दिवशी लागोपाठ एकाच विषयावरचे 'नैना' (उर्मिला मातोंडकर) आणि 'नजर' (अस्मित पटेल-मीरा) हे चित्रपट दोन वेगवेगळ्या थिएटरमध्ये बघण्याचा वि(च)क्रम केला तेव्हा माझेच डोळे मला 'सैतानी डोळे' आहेत असे वाटायला लागले होते... जो 'वीर-झारा' थिएटरमध्ये बघून झाल्यावर मी फक्त "बकवास" एवढेच म्हणालो होतो तोच चित्रपट मी नंतर सीडी-केबल नेटवर्क वर कमीत कमी दहादा का बघितला याचे उत्तर आजतागायत माझ्याकडे नाहीय... उर्मिलाचा 'भूत' सिनेमा बघताना एका अचानक घडणाऱ्या सीनला घाबरून माझ्या बाजूच्या प्रेक्षकाच्या तोंडातला गुटखा फुग्यासारखा फुटून समोरच्या प्रेक्षकाचे शर्ट रक्तरंजित झालेले मी याची देही याची डोळा बघितलेले आहे... आणि हा वास्तविक जिवंत सीन बघूनसुद्धा जराही विचलित ना होता मी परत एकदा माझी दृष्टी सिनेमा पडद्याकडे वळवली'.... तर असे हे माझे सिनेमाप्रेम... ज्या घरातली आई टीव्हीवर अजय देवगण दिसताच "काळो इलो" असे म्हणते त्या घरात माझ्यासारखा चित्रपटप्रेमी जन्माला यावा हा दैवयोगच म्हणावा लागेल... 

माझ्यासारख्या उंदराची लेखन शैली घडवण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे... 'एकापेक्षा एक अप्सरा आली' मध्ये आरती सोळंकी सारखी 'अप-पसारा' स्पर्धक म्हणून चालत असेल आणि जर सचिन पिळगावकर साहेब नृत्यामधले महागुरू (फक्त ते निर्माते आहेत) म्हणून चालत असतील तर माझ्या ब्लॉगवर मी सुद्धा स्वत:ला लेखक म्हणवू शकतो...एकदा माझा मित्र म्हणाला होता की तू अगदी शिरीष कणेकरांसारखा लिहितोस... तुमच्या समवेत तुलना कितीही सुखावह असली तरी कुठे तुमचे लिखाण आणि कुठे माझा ब्लॉग... हरमन बावेजा ह्रितिकसारखा दिसत असला तरी त्याला शेवटी 'हॉरर क्वीन' बिपाशा सुद्धा मिळाली नाही (आणि ती मिळाली त्या 'अति-विवाहित' करण सिंग ग्रोवर ला...)...ब्लॉग म्हणजे काय तर स्वतःचे लिखाण स्वतःच शंभरदा वाचायचे ... आणि ते इतरांनी वाचावे म्हणून स्वतःच्याच मित्रांना आणि नातेवाईकांना गळ घालायची... इति माझी बायको...  यापेक्षा विमा एजंट बनून त्यांच्या गळ्यात पॉलिसी 'मारून' काहीतरी कमवा असे बायकोचे प्रशंसोद्गार कानी पडल्यावर मी माझे उत्स्फूर्त लिखाण लगेच आवरते घेतो... 

तुमचे मत्स्य-प्रेम जसे जगजाहीर आहे तसेच मला सुद्धा लग्नाअगोदर पापलेट आणि सुरमई यांसारखे महागडे मासे खायला आवडायचे... लग्नानंतर मात्र मी मांदेली आणि बोंबील यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करायला लागलो...  गृह'कर्ज'बाजारी झाल्यानंतर मला कोंबडीची अंडी खायला आवडायला लागले आणि हल्ली तर शेजाऱ्यांच्या घरून येणारे माशांचे वास हुंगूनच माझे पोट भरते... बहुधा उत्क्रांतीवाद यालाच म्हणत असावेत... 

तुमचे लिखाण खूप आवडत असले तरी तुम्हालासुद्धा सरासरीचा कायदा (Law of Average) लागू होतो हे निश्चित... उदाहरणार्थ 'झुरळ' या प्राण्यावरचे तुमचे लेख...तथाकथित परफेक्शनिस्ट आमिर खान ने 'मेला' सारखा रद्दड चित्रपट द्यावा तसे तुम्ही सुद्धा कधीतरी म्हणतच असाल ... "रोज रोज चांगले चुंगले लिहून कंटाळा आला बुवा... आज झुरळावर लिहितो (अर्थात कागदावरच)...." अवधूत गुप्तेला संतोष जुवेकर आणि धोनीला रैना-जाडेजा जेवढे आवडत असतील तेवढेच तुम्हाला दिलीप कुमार आवडतात... हे चाहतेपण आम्हाला समजणार नाही कारण आमची कमनशिबी पिढी शाहरुखचा (तुमच्या शब्दात तोतरा आणि नकली दिलीप कुमार) अभिनय बघूनच चाळिशीला मार्गस्थ झाली... तुम्ही जसे बरेच कलाकार जवळून बघितले (म्हणजे संवाद साधलात) तसे काही प्रसंग माझ्यासुद्धा वाट्याला आले... माझ्या लहानपणी 'वस्रहरण' नाटकाच्या प्रयोगावेळी एका मेकअपमन नातेवाईकाने मला मेकअप रूम मध्ये नेले होते तेव्हा मी एवढ्या मोठ्याने बोंब ठोकली होती की नाटक सुरु होऊन गोप्याने आरोळी दिली की काय असे वाटून शिवाजी मंदिरातल्या प्रेक्षकांनी हातातले बटाटेवडे तसेच पकडून आपापल्या सीटकडे धाव घेतली होती ... ऑल दि बेस्ट (मुलींचा संच) प्रयोगाच्या मध्यंतरी मला माझ्या मित्राने मेकअप रूमकडे नेऊन क्षिती जोग आणि आदिती सारंगधर यांचे दर्शन घडवून आणले होते तेव्हा मला बघून त्या दोघी किंचाळल्या नाहीत हेच माझे अहोभाग्य...

तुमचा साहित्यविश्व-चित्रपटसृष्टी-क्रिकेट जगताशी फार जवळचा संबंध असल्याने माझ्या मनातल्या काही प्रश्नांची तुम्ही उकल करावी अशी विनंती...

अशोक शिंदे हा अभिनेता नक्की केव्हापासून तरुण आहे?
चेतन भगत ची सगळी पुस्तके वाचली म्हणजे आपण इंग्लिश साहित्यामध्ये मध्ये डी.लिट. आहोत असे काही जणांना का वाटते ?
सई ताम्हणकर ची मराठी भाषा ही कतरिना कैफ च्या हिंदीच्या तोडीची आहे का... आणि असल्यास ती आनंद इंगळे-वैभव मांगले प्रभुतींकडे मराठीच्या शिकवणीसाठी का जात नाही?
केतकी माटेगावकरच्या मोठेपणीच्या भूमिका वाट्याला येऊन काही काम मिळू दे असा नवस प्रिया बापट देवाकडे करत असेल का?
काही चित्रपट समीक्षक (विशेषतः मयंक शेखर) त्यांच्या चित्रपट समीक्षणात प्रत्येक संवाद आणि सीनची तुलना परदेशी चित्रपटांबरोबर करून मुळात आपण कुठल्या चित्रपटाचे समीक्षण करतोय हे विसरून का जातात?
प्रत्येक नाचात हिरो मध्यभागी अथवा सर्वात पुढे का असतो? सिनेमा मधली दहीहंडी नेहमी नायकच का फोडतो? की असे करू शकतात म्हणूनच ते हिरो असतात?
जुवेकर आडनावांच्या लोकांचा आवाज घोगरा अथवा भसाडाच असतो का? (संदर्भ: माधवी जुवेकर आणि संतोष जुवेकर)
रेणुका शहाणे गोड हसते म्हणून ती विनोदी अभिनयाचे परीक्षण करू शकते असे तिला का वाटते?
सोनू निगमच्या सुरुवातीच्या दिवसात त्याला गुलशन कुमार पुरस्कृत भक्तिगीते आणि महम्मद रफीसाहेबांची नक्कलगीते गाताना बघून त्याच्यावर फिदीफिदी हसण्याऱ्या माणसाला (म्हणजे मी) आता त्याचा फॅन बनण्याचा हक्क आहे का?
विनोद कांबळी आणि गायक अभिजित (भट्टाचार्य) यांची जन्मकुंडली एकच असेल का...?
मराठी माणसाला लता-सचिन-पु.लं. याखेरीज कोणीच आवडत नाही या अमराठी माणसांच्या आक्षेपात कितपत तथ्य आहे?
ज्या लोकांना गोड शेवट असलेलेच चित्रपट आवडतात त्यांना बडजात्यांचे सिनेमे बंधनकारक करावेत का?



तूर्तास एवढेच प्रश्न पुरेसे आहेत...



तुम्हाला न्यूज चॅनेल वरच्या चर्चेत एखाद्या चौकोनी कोपऱ्यामध्ये प्रतिक्रिया देताना बघण्यापेक्षा शिवाजी पार्कला तुम्ही हाफ पँट घातलेली असताना भेटावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे... खूप वर्षांपासून जगजीत सिंग यांची लाइव्ह गझल मैफल ऐकायला मिळावी असे माझे स्वप्न होते... जगजीतजी वारले... खूप वर्षांपासून मंगेश पाडगावकर यांचे काव्य वाचन प्रत्यक्ष ऐकायला मिळावे हे देखील माझे स्वप्न होते... पाडगावकरकाका वारले... तुमच्या एकपात्री प्रयोगाची हल्ली जाहिरात बघितली नाही मी... तेव्हा तुम्हाला भेटायची संधी मला लवकरच मिळो अशी देवाचरणी प्रार्थना !

टीव्हीवर सचिनला खेळताना बघून ब्रॅडमन त्याच्या बायकोला म्हणाला होता... "अगं... हा बघ... अगदी माझ्या सारखाच खेळतो हा "... माझे पत्र वाचून तुम्हीसुद्धा तुमच्या सौभाग्यवतींना "अगं... हे वाच ...अगदी माझ्या सारखाच लिहितो हा..." असे म्हणाल का? आणि जर तेवढीसुद्धा पात्रता माझ्या लिखाणात नसेल तर तुम्ही किमान मला 'तोतया शिरीष कणेकर' तरी म्हणा !

लिहिताना काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा... तुम्ही कैक पटीने मोठे आहेत माझ्यासारख्या पामरापेक्षा... आणि तुमच्याच शब्दात... मोठ्या माणसांचे सगळेच मोठे असते.... अगदी टमरेल सुद्धा.... तो मन क्या चीज है !


तुमचा कट्टर वाचक, जबराट चाहता आणि स्वयंघोषित शिष्य,

योगेश बेळेकर 

5 comments:

  1. PRASAD म्हणाले...:

    अग्गागा काय लिहलयस रे मित्रा.सचिन पिऴगावकरला आम्ही मित्र महा'हा'गरू म्हणायचो. तुझी ही कला माहित नव्हती, ब्लॉग फॉलो करतोय, एक टुकार वाचक मिळाला तुला.

  1. मस्त लिहिलं आहे, खास करून ते प्रश्न :)

  1. Unknown म्हणाले...:

    एकदम झकास भाऊ... आयला म्हणजे माझ्यासारखे प्रश्न इतरांनाही पडतात... मी उगाच स्वताला येडा समजायचो

  1. अनामित म्हणाले...:

    छान पोस्ट.

    PRASAD, मला वाटलं सचिन पिऴगावकरला महा'हा'गरू मीच म्हणतो.

  1. Yogesh म्हणाले...:

    Thanks प्रसाद, विनय आणि दिलीप ! ☺

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.