बुधवार, १२ एप्रिल, २०१७ |
0
comments
"काय रे...आता जे जोडपे गेले ते नवरा बायको आहेत का?" कुलकर्णी काकांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे उगीच विचारले मला...
मी उत्तरलो: "नाही हो...ते 'लिव्ह-इन' मधले आहेत"
कुलकर्णी काका: "अरे ते 'बी विंग' मध्ये राहत नाहीत... मी विचारतोय काय आणि तू सांगतोय काय?"
मी निरुत्तर...
कुलकर्णी काका: तो मुलगा नोकरीला जाताना दिसतो...ती मुलगी काय करते समजत नाही...
मी: अहो...ती गायनॅक आहे...
(मध्येच संभाषण तोडून) परबकाका: ती 'गायनाक' कदी पासून जाऊक लागली...सादा बोलूक सुद्धा शिरा ताणता गळ्याचो...शिरा पडली तिच्या तोंडावर...मेला गातला..."
मितवा चित्रपटात क्लोजअप शॉट्स मध्ये सोनाली कुलकर्णीच्या चेहऱ्यावर जेवढ्या सुरकुत्या दिसतात त्यापेक्षा थोडया कमी आठ्या आता माझ्या कपाळावर दिसू लागल्या...
या दोघांच्या हवे तिथे आणि पाहिजे तेवढेच कमी ऐकू येण्याच्या इच्छाशक्तीचा उपयोग घरी बायकोसमोर केल्यास सदैव सुखी असणाऱ्या माणसाचा सदरा प्राप्त होईल हे मला कळून चुकलेय...
तर असे हे आमचे कुलकर्णी काका... सोसायटीमध्ये राहणाऱ्या व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाची आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती आपल्याला असावी असा या व्यक्तीचा अट्टाहास असतो... काही वर्षांपूर्वी चाळीतून फ्लॅटमध्ये रहायला आलेला हा माणूस आजही आपल्या चाळकरी पूर्वेतिहासातली रमणीय पाने 'चाळ'त बसण्यातच धन्यता मानतो...फ्लॅटच्या भिंतींमध्ये बंदिस्त न राहता लोकांमध्ये रमण्याची आणि जीव अडकवण्याची ही वाईट सवय त्यांना अख्खे आयुष्य व्यतीत केलेल्या चाळीमध्ये लागलेली... एखाद्या किर्तनकाराच्या आवेशात चाळीतल्या आठवणींचे प्रवचन सांगणाऱ्या कुलकर्णी काकांना बघून काही लोक त्यांना म्हातार'चाळ' लागलीय असे उपहासाने म्हणतात... सुखविंदर सिंग जसा स्टुडिओमध्ये पूर्ण अंधारात गाणे वाचून गातो तसेच काका झोपेतसुद्धा 'चाळ नावाची वाचाळ वस्ती' चे एकपात्री प्रयोग करू शकतील असे मला वाटते...
कुलकर्णी काकांच्या फ्लॅटच्या बाल्कनीमधली तुळस आजही 'डालडा'च्या पिवळ्या डब्ब्यातच विराजमान आहे...मी असे ऐकलेय की काका अजूनही टॉयलेटला एशिअन पेंट्सने पुरस्कृत केलेले टमरेलच घेऊन जातात... टॉयलेटमध्ये कोणीही नसले तरी अगोदर ५ मिनिटे बाहेर रांगेत एकटे उभे राहिल्यानंतरच त्यांच्या पोटात कळा येऊन त्यांना 'सुलभ' शौचाला होते... (पावसाळ्यात म्हणे ते चाळीतल्या गळक्या संडासात राखीव छत्री आणि 'रिकाम्या' टमरेल सोबत प्रातर्विधीस जात असत...!) नळाला चोवीस तास पाणी असतानासुद्धा पाइप लावून घरातली भांडी पाण्याने भरून ठेवणे, बाथरूमला 'मोरी' आणि टॉयलेटला 'संडास' असेच संबोधणे ("आपलीच मोरी आणि मुतायची चोरी" हा त्यांचा आवडता डायलॉग), घरी येणारा पेपर वाचून झाल्यावर शेजाऱ्यांचे पेपर गोळा करून वाचणे इत्यादी काकांचे 'चाळ'हट्ट अजूनही चालूच आहेत....
बंद दरवाज्याच्या आड घुसमटणाऱ्या काकांसाठी डोअर की होल हा त्यांचा तिसरा डोळा आणि काकांच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांसाठी सीसीटीव्ही बनतो...बाजूच्या घराची बेल कुणीही दाबली की शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याअगोदर काकांच्या डोळ्यातला बायोमेट्रिक सेन्सर त्या माणसाचे रिडींग करतो... चाळीत राहताना इतरांच्या घरातील दैनंदिन कौटुंबिक मालिकांचे थेट प्रक्षेपण घराच्या उंबरठ्यावरूनच विनासायास बघायला मिळाल्यावर काकांना कधी केबल टीव्हीची गरजच भासली नसेल... घराबाहेरील गॅलरीत मोठाली पाण्याची पिंपे ठेवायची सवय असण्याऱ्या काकांना जेव्हा आमच्या सोसायटीने नोटीस काढून दाराबाहेर चपला ठेवायची मनाई केली तेव्हा त्यांना बा.सी. मर्ढेकर यांच्या 'पिपात मेले ओल्या उंदीर' ही कविता वाचताना झालेल्या मरणयातनेपेक्षा ती नोटीस जिव्हारी लागली असेल....
आर्ट डिरेक्टर नितीन चंद्रकांत देसाईपेक्षा जास्त सफाईने काका फक्त बोलण्यामधूनच चाळीचा सजीव चलचित्र देखावा आपल्यासमोर उभा करतात... चाळीतले एकमेकांच्या घरातून येणारे आणि पोटात कालवाकालव करणारे जेवणाचे 'चविष्ट' वास, मजल्यावरच्या चौकात कोळीण आल्यावर लहान मुले बायोस्कोप बघायला जमावेत तसे तिला गराडा घालून घासाघीस करणाऱ्या घसघशीत बायका, उरलेल्या आंघोळीच्या साबणाच्या तुकड्यांचा गळक्या पिंपावर बंधारा म्हणून अथवा मोरीच्या भिंतींवर थापटून हॅण्डवॉश डिस्पेन्सर म्हणून केलेला वापर, संध्याकाळी अचानक लाईट गेल्यानंतर बिळातून उंदीर बाहेर पडावेत तसे गलका करत बाहेर मोकाट सुटणारी पोरे, एखादा चाळीतला माणूस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यावर हॉस्पिटलच्या स्टाफपेक्षा जास्त संख्येने उपस्थित असणारे त्याचे शेजारी, मजल्यावरच्या चौकात दुपारी गहू तांदळा बरोबर निवडले-सडले जाणारी अनुपस्थित बायकांच्या घरातली लफडी-भांडणे-अंतर्गत बातम्या, समोरासमोरच्या गॅलरीच्या कठड्यावर बांधलेल्या कपडे वाळवण्यासाठीच्या सामायिक दोऱ्या...आजूबाजूच्या संडासात बसून दार उघडे ठेवून गप्पा मारत 'कार्यभाग' साधणारे लहान बालमित्र....या आणि अशा बऱ्याच काही चाळीतल्या गंमती-जमती काकांच्या मुखातून साभिनय ऐकणे हे डेव्हिड धवन-मनमोहन देसाई यांच्या करमणूकप्रधान चित्रपटांपेक्षाही जास्त मनोरंजक असते...
कुलकर्णी काका अजूनही चाळीच्या आठवणींमधून बाहेर आलेले नाहीत याबद्दल कुणी आक्षेप घेण्याचे कारण नसावे... (इथे मीच अजून नव्वदच्या दशकातील गाण्यांमधून बाहेर पडलेलो नाहीय !)...फरहान-झोया अख्तर फक्त श्रीमंत लोकांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या सो-कॉल्ड समस्यांबद्दल चित्रपट काढू शकतात, रॉबिन सिंग फक्त लेग साईडला फटके मारू शकतो, चित्रपटाची नायिका निष्पाप आणि निरागस दाखवण्यासाठी तिने एखाद्या कोकरूला कवटाळलेच अथवा लहान मुलांबरोबर खेळले-नाचलेच पाहिजे, चित्रपटातील नायकाच्या कॉलेज ग्रुपमध्ये एक गलेलठ्ठ मुलगा आणि वर्गामध्ये एक बायकी हावभाव करणारा मुलगा हे असलेच पाहिजेत.... नवीन घरामध्ये नवीन संसार मांडताना घराचे रंगकाम नायक आणि नायिका या दोघांनीच एकमेकांवर रंग उधळत केले पाहिजे या आणि अशा असंख्य अलिखित नियमांनुसार कुलकर्णी काकांनी फक्त 'चाळ' या विषयावरच बोलावे असे माझे मत आहे...आणि एकदा का ते बोलायला लागले की 'सिर्फ तुम' मध्ये प्रिया गिल-संजय कपूर यांना एकमेकांना भेटायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ ते बोलू शकतात....
काकांच्या मुलाचे लग्न ते चाळीमध्ये राहतात या कारणामुळे खूप वर्षे जमत नव्हते... काही जणींनी फक्त संडास घराबाहेर आहे या कारणाने स्थळ नाकारले... सेंट्रल विरुद्ध वेस्टर्न हा तिढा होताच...एके ठिकाणी लग्न जमल्यावर काकांचा मुलगा होणाऱ्या बायकोला पिक्चर बघायला घेऊन गेला (अर्थातच सिंगल स्क्रीन!)... मध्यंतरात त्याने कटिंग चहा मागवली आणि घरून आणलेल्या डब्यातून बिस्किटे बाहेर काढली...घरी पोहोचल्यावर त्या मुलीने लग्न मोडल्याचे जाहीर केले हे सांगणे न लगे... कमी खर्चात साधेपणाने जगायचा चाळीतला वारसा त्याला पुढील आयुष्यात खूप उपयोगी आला....
मुंबईत झालेल्या दंगलीच्या काळात काका रात्रभर इतर शेजारी कर्त्या पुरुषांसोबत स्वयंपाकघरातले कोयते, विळ्या आणि सुरे घेऊन चाळीतल्या गॅलरीत पहारा देत असत... जागरण करणाऱ्यांना कुलकर्णी काकूंच्या हातचे कांदेपोहे-शिरा-उपमा खायला मिळणार या ऑफरमुळेच बरेच जण रात्रीच्या पहाऱ्याला येत असत... विरुद्ध पार्टीला सुद्धा असा काकू स्पेशल नाश्ता दिला असता तर दंगल लगेच आटोक्यात आली असती असे चाळकरी म्हणत....
नंतर काकू बरीच वर्षे अंथरुणाला खिळून होत्या... त्यांचे सगळे काही जागेवरच करताना काकांच्या चेहऱ्यावर, मनात आणि वागण्यात कधीही कटुता अथवा त्रासिकता नव्हती... काकूंच्या अंत्यदर्शनाला आलेल्या लोकांनी जेव्हा काकूंच्या तोंडात पाणी घालून झाले तेव्हा काकांनी आपला रुमाल काढून काकूंचे तोंड एकदम हळूवारपणे एखाद्या लहान मुलाचे तोंड पुसावे तसे पुसले... प्रेम म्हणतात ते हेच असे मला तेव्हा जाणवले....
गप्पा मारण्यासाठी नेहमी आसुसलेलेे काका त्यादिवशी मात्र जरासे भावूक होऊन मला म्हणाले... "थोडे थांबून २ मिनिटे का होईना बोललास माझ्याबरोबर....छान वाटले मला... नाहीतर तुम्हाला वेळ असतो कुठे बोलायला... मग कुणीही दिसले की आम्हीच Hi म्हणतो ...अजून आम्ही 'हाय' या अर्थाने... हल्ली एखाद्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असली तरी आमंत्रण न देता थेट प्रसादच घरपोच केला जातो... पूजेच्या निमित्ताने आपल्या घरी कोणी येऊ नये म्हणून केवढा हा खटाटोप...आमच्या चाळीत कुणाकडे पूजा अथवा मंगलकार्य असले की त्याच्या घरी आलेले पाहुणे शेजाऱ्यांच्या घरात झोपायला आणि आंघोळ करायला असायचे....आणि........."
नेहमीप्रमाणे काकांची टकळी चालू झाली...
गोविंदाला विक्रम गोखलेंचे लांबलचक पॉज असलेले संवाद, उषा नाडकर्णी-दया डोंगरे यांना प्रेमळ सासूचे कॅरॅक्टर आणि नेहमी पिचलेल्या गरीब बापाची भूमिका करण्याऱ्या किशोर कदम यांना श्रीमंत माजलेल्या बापाची भूमिका कधीच शोभणार नाहीत !
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा