बटाट्याची सोसायटी: महाभाग ३ : खोटा राजन

आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ही म्हण खरी ठरवायला काही माणसे जन्माला आलेली असतात (उदाहरणार्थ: राखी सावंत).... काहींना आपल्याला चित्रपटामधले सगळ्यातले सगळे कळते असे वाटते (उदा: अवधूत गुप्ते)...  काहींना एकांकिका स्पर्धा बघून आपल्याला नाटकाची जाण आहे असे वाटते (उदा: मी).... काहींना कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून आपल्याला क्रिकेटच्या मैदानातले सगळे डावपेच येतात असे वाटते (उदा: आकाश चोप्रा आणि अरुण लाल ).... काहींना सीरियलमध्ये एखादी स्त्री-प्रधान भूमिका केल्यावर आपण स्त्री-सक्षमीकरण संबंधित परिसंवादामध्ये हक्काने बोलू शकतो असे वाटते (उदा: माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका) ... तर फायनान्स क्षेत्रात नोकरी केली की आपण एखादे नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थशास्त्रज्ञ अथवा गेलाबाजार भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर आहोत असा गैरसमज काहीजण स्वतःच्या डोक्यात पाळीव प्राणी म्हणून पाळतात... याचे उदाहरण कशाला... साक्षात जिवंत नमुनाच मी आपल्यापुढे सादर करतो... तो म्हणजे आमच्या सोसायटीमधला राजन गुप्ते ... (अजून एक गुप्ते!) उर्फ खोटा राजन.... आपल्याकडे तीनच राजन आहेत....  एक छोटा.... एक मोठा (रघुराम राजन) आणि हा एक खोटा ...

राजन गुप्ते हा दांभिक इसम फायनान्समध्ये नोकरी करतो हे वेगळे सांगायची गरज न लगे... याच्या काखेत नेहमी इकॉनॉमिक टाइम्सची घडी 'वास' करून असते... त्याच्या घरामध्ये गेले की सोफ्यावर ३ ते ४ वेगवेगळी अर्थवृत्तपत्रे विराजमान असतात... इथे आमच्या पेपरवाल्याला रविवारचा इकॉनॉमिक टाइम्स महाग असतो म्हणून फक्त सोमवार ते शनिवारच हा पेपर हवा असे दोन-तीनदा कानीकपाळी ओरडून सांगावे लागते...  तर या माणसाला आठवड्याच्या सातही दिवशी एवढे सारे पेपर विकत घेणे कसे परवडते हे कोडेच होते... हा माणूस आपल्या मुलांना 'शि-शु'वर्गातच अर्थव्यवस्थेची तोंडओळख व्हावी म्हणून 'शी' करायला इकॉनॉमिक टाइम्सचा 'पिवळा' पेपरच देतो म्हणे .... दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दूधवाला बिलाचे पैसे मागायला येऊन जायच्या अगोदर रद्दीवाला या गुप्त्याच्या घरी कसा काय नेमका टपकतो हे अजून एक गुपित होते...  या सगळ्याचा उलगडा मला कालच्या आठवड्यात झाला...

मी ऑफिसमधून येताना हा इरसाल माणूस मला बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये भेटला ... अर्थातच हा अर्थतज्ञ् हातात नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण पेपर मिरवत होता... माझ्या नशिबाने चुकून मी अगोदरच्या दिवशीचा पेपर उघडून त्यातली फक्त ठळक बातमी वाचली होती (आपल्याला जेवढे झेपते तेवढेच माणसाने करावे... 'कोयला' मधला अमरीश पुरी हा 'गर्दीश' मधला अमरीश पुरी बनू शकतो... त्याच्या अभिनयाची रेंज होती तेवढी... आपल्या चेतन दळवीने 'नटसम्राट' नाटक केले तर कुसुमाग्रज सर स्वत: येतील "बंद करा...बंद करा" असे ओरडत)...  म्हणून मला समजले की त्याच्या हातातला पेपर हा कालचा होता आणि तो त्याने त्याच्या ऑफिसमधून ढापून आणला असावा यात मला काही शंका उरली नव्हती...  तोंडावर कसे विचारणार म्हणून कोकणी चिमटा काढला...

मी : काय गुप्ते... अजून तुम्ही जगाच्या पाठीवरच आहात का एका दिवसाने ?
गुप्तेचा चेहरा शेअर मार्केटसारखा खाडकन उतरला ....
खोटा राजन: नाही हो... नेमका एक अभ्यासपूर्ण लेख वाचायचे माझे राहून गेले होते काल...  म्हणून हा कालचा पेपर .... काय आहे माहित्येय का... रिझर्व्ह बँकेने एक धोरणात्मक निर्णय घेण्याअगोदर अभ्यासू, सुजाण आणि ज्ञानी नागरिकांची मते मागवली आहेत .... तर त्यासाठी हा एवढा प्रपंच....
या भामट्याकडून त्याचा बालवाडीतला मुलगासुद्धा स्वत:चे ढुंगण कसे धुवावे या गहन विषयावर त्याचे मत विचारणार नाही...!

राजन गुप्तेसारखी बरीच माणसे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडतील..... कुठेतरी वाचलेल्या अथवा ऐकलेल्या शेअर मार्केटच्या बातम्या किंवा सकाळी सकाळी मेसेज मधून येणारे 'स्टॉक टिप्स' या तुटपुंज्या भांडवलावर दिवसभरात भेटणाऱ्या कुठल्याही माणसासोबत ते चेकाळून महाचर्चा करू शकतात....एखाद्या दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गल्लीतल्या गटारावरची लोखंडी झाकणे काढून सिमेंटची झाकणे बसवली तरीसुद्धा सिमेंटचे शेअर्स कसे वाढणार आहेत याची भाकिते रंगवतात असे लोक... शेअर मार्केटच्या चढ-उतारावर पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते असे यांचे उलटे गणित...एखाद्या दिवशी निफ्टी २०-३० अंशांनी सुद्धा खाली गेली तरी सुतकी चेहरा करून या देशाचे काही खरे नाही असे मरणप्राय भाकित वर्तवणारे हे रस्त्यावरचे (पक्षी: दलाल स्ट्रीट) कुडमुडे ज्योतिषी....अंगावर झाडाचे पान पडले म्हणून आकाश कोसळल्याची बोंब मारणाऱ्या सशाचे काळीज असणारे हे थोतांडपंडित...

त्या दिवशी संध्याकाळी सोसायटीच्या कामानिमित्त गुप्तेच्या घरी गेलो असता अपेक्षेप्रमाणे घरातल्या टिव्हीवरती अर्थवृत्तीय चॅनेल चालू होते... काही रिकामटेकड्या लोकांचे 'अमेरिकन फेडरल रिझर्व्ह चेअरमन यांची शारीरिक उंची आणि तत्कालीन व्याजदर' अशा निरुपयोगी विषयावर चर्चासत्र सुरु होते... गुप्तेचे लक्ष नाहीय हे बघून मी पटकन रिमोटवरचे 'लास्ट चॅनेल व्हिझिटेड'चे बटण दाबले तेव्हा एफ टीव्ही चॅनेल चालू झाले ... गुप्ते जाम चपापला... घराची बेल वाजली की त्यांच्या टीव्हीवरचे चॅनेल आपोआप बदलत असावे बहुतेक... 

दुसऱ्या दिवशी गुप्ते कॉलनीच्या रस्त्यातून माझ्यापुढे चालत असताना त्याला टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील फोटो गॅलरीमध्ये सिनेतारकांचे रसरशीत फोटो बघताना पकडलाच...
मी: "काय गुप्ते ...आज मार्केट एकदम 'गरम' दिसतेय ... "
मोबाईल स्क्रीन लॉक करताना गुप्तेची तारांबळ उडाली ...
गुप्ते: "नाही हो... खुल्या अर्थव्यवस्थेबद्दल वाचत होतो...तुम्हाला म्हणून सांगतो... आपल्या इकॉनॉमीची दारे सगळ्यांना उघडी केली तरच या देशाचे भवितव्य.... (इत्यादी इत्यादी...)"
मी: अहो इंटरनेटवर हल्ली 'पाहिजे ते' उपलब्ध आहे... अजून काय हवेय तुम्हाला ?
गुप्ते (इथे ओशाळला गुप्तू): तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट्स बद्दल बोलताय ना ?
माझा शेवटचा प्रहार: "तुमचे विचार किती पुरोगामी आणि दूरगामी आहेत गुप्ते... 'उघड्या' अर्थव्यवस्थेचे एव्हढे खंदे समर्थन मल्लिका शेरावत सुद्धा करणार नाही...!"
गुप्ते गुपचूप दुसऱ्या गल्लीत शिरला...

संसदेत बजेट सादरीकरणाच्या दिवशी संध्याकाळचा हमखास संवाद खालीलप्रमाणे :
गुप्ते: काय हो... आजचे बजेट बघितले की नाही ?
मी: छे हो.... होम लोनचा हप्ता वगळून जी वजाबाकी आमच्या पदरी शिल्लक राहते तेच आमचे महिन्याचे बजेट... कुठलेही सरकार आम्हाला गृहकर्जमाफी देणार आहे का बजेटमध्ये....?
गुप्ते: तुम्ही साले संकुचित विचारांच्या स्वार्थी पांढरपेशा नोकरदार वर्गाचे प्रातिनिधीक उदाहरण आहात...
मी: बरं बाबा ... तुम्ही गुलजार... आम्ही रोहित शेट्टी... झाले समाधान?
गुप्ते: अशी सिनेमॅटिक उदाहरणे देऊन तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा हास्यास्पद सिनेमा बनवलाय !
मी: कसला सिनेमा भाऊसाहेब ...आम्ही होम लोन वाले... आमची स्वप्ने म्हणजे फिक्शन आणि आमचे आयुष्य म्हणजे निरस डॉक्युमेंटरी झालीय... आणि सिनेमा तर सिनेमा... असू दे ... चार टाळकी बघायला तरी येतील...  तुमचे आयुष्य म्हणजे प्रायोगिक नाटक आहे... फक्त तत्वज्ञानाचा खोटा आवेश ... भाड्याची माणसे सुद्धा नाही जमवता येत प्रेक्षक म्हणून...
गुप्ते:जरा नाटक -सिनेमा- होम लोनच्या बाहेरचे जग सुद्धा बघा पंत...
मी: अरे हो... बघण्यावरून आठवले... कालच तुमचे नाव सोसायटीच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये बघितले... मेरीट लिस्टमध्ये नाव येऊ न शकल्याची कसर भरून काढलीच की तुम्ही राव ....
गुप्ते ('बाहू' सरसावत): अरेच्या... माझी सेक्रेटरी (म्हणजे बायको) विसरली वाटते चेक भरायला...
(१९९६च्या क्रिकेट विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलला ज्या त्वेषात बाहेरचा रस्ता दाखवला त्याच आवेशात मी हातवारे करत... )
मी: आधी सोसायटी सेक्रेटरीकडे जा 'दंड' भरायला...
गुप्तेंना ही खुपते म्हणजे...!

मी (किरकोळ) छातीठोकपणे सांगतो... या माणसाची स्टॉक मार्केट अथवा म्युच्युअल फंड मध्ये काडीची गुंतवणूक नसेल... जे काही असेल ते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (ते सुद्धा फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया) आणि हुंड्यामध्ये व दिवाळ सणामध्ये 'जावई' या लाभार्थी पदामुळे मिळालेले सोने बँकेच्या लॉकरमध्ये ... बस्स एवढेच... आणि मला खात्री आहे कि ज्या दिवशी त्याचे हे बिंग फुटेल त्या वेळी सुद्धा तो तोंड वरती करून बोलेल.... "मार्केटमध्ये करेक्शन येणार आहे म्हणून माझी सगळी गुंतवणूक अल्पावधीसाठी सुरक्षित पार्क केली आहे इथे... "  (मार्केट) गिरे तो भी टांग उपर !

गुप्तेबद्दल मला बाहेरून समजलेली गंमत अशी की... हा माणूस एकदा ऑफिसच्या वॉश रूममध्ये लघुशंकेसाठी गेला असता बाजूला 'धार'णेसाठी उभा असलेल्या एका सहकारी कर्मचाऱ्याला त्याने विचारले ...
गुप्ते:"काय हो.. आज वाढला का ?"
बाजूच्या माणसाच्या कपाळात... आय मीन... कपाळावर भले मोठे प्रश्नचिन्ह...
गुप्ते: अहो सेन्सेक्स हो !
बाजूचा माणूस आधीच गर्भगळीत... त्या गडबडीत त्याने 'सेन्सेक्स' हा शब्द 'सेम-सेक्स' असा ऐकला ... त्या दिवसापासून तो माणूस ऑफिसच्या मुतारीत न जाता दिवसभर स्वतःच्या खुर्चीवर मुताची पिशवी लावूनच बसतो म्हणे... !

मला वाटलेले की या खोट्या राजनची बायको तरी बरी असेल (म्हणजे तशी बरी नाही हो... सेन्सिबल म्हणतोय मी)... गुप्ते हा जर अभिषेक बच्चनसारखा फ्लॉप असला तरी निदान त्याची बायको ऐश्वर्या (नारकरांची नाही हो... रायांची !) असावी एव्हढीच माफक अपेक्षा... (इथे ऐश्वर्याला अजूनही सहज चित्रपट मिळत आहेत तर तिथे अभिषेकला काहीतरी काम मिळावे म्हणून फराह खान सारख्या 'वराह' दिग्दर्शकाकडे 'हॅपी न्यू इयर'चा सिक्वेल काढ म्हणून हात पसरावे लागतात... )

तर त्या दिवशी गुप्तेची बायको माझ्या घरी आली असताना (म्हणजे माझी बायको घरात हजर असताना!) तिने तिच्या नवऱ्याप्रमाणेच मुक्ताफळे उधळली...
गुप्तेची बायको: "आम्ही हल्ली जेवणामध्ये तेल नावालाच वापरतो बाई ... क्रूड ऑइल किती महागलेय सांगू... "
मी: "वहिनी....  तुम्हाला एडिबल ऑइल म्हणायचेय का ?"
गुप्तेची बायको: "नाही हो... क्रूड ऑइलच ... तुम्हाला काही कल्पनाच नाही...राजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये सगळेच परस्परसंबंधित असतात....(दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवरील 'हॅलो सखी' कार्यक्रमाच्या निवेदिकेच्या शैलीत) आर्थिक जागतिकीकरणाचे वारे इतके जोरात वाहत आहेत की आफ्रिकन देशातल्या फुलपाखराने पंखांची नुसती फडफड केली तरी त्याचे रूपांतर भारतामध्ये चक्रीवादळात होऊ शकेल... "
मला उगीच खिडकीच्या दोरीवर सुकत घातलेल्या आणि हवेने फडफडणाऱ्या माझ्या जुन्या चड्डीची काळजी वाटू लागली... होम सायन्स घेऊन अर्थशास्त्रज्ञ झालेला नमुना मी प्रथमच पाहत होतो...

मला एवढी वर्षे कुतूहल होते की हा गुप्ते नक्की एव्हढे कसले मोठे आर्थिक संशोधनकार्य करतो त्याच्या ऑफिसमध्ये.. मराठी बिग बॉस मध्ये उषा नाडकर्णीचा आक्रस्ताळेपणा बघू शकणारा मी ... दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघायला आवडणारच मला...  तर योगायोगाने माझा मित्र गुप्तेच्या ऑफिसमध्येच काम करत असल्याचे कळले मला ... त्याला फोन करून मी विचारले तेव्हा मला समजले की हा गुप्ते तिकडे रोज ३ बँकेंना (ते सुद्धा त्याच्या बॉसने ठरवून दिलेल्या) कॉल करून फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर विचारतो आणि जिथे जास्त दर असेल तिथे पैसे ट्रान्सफर करून एफ.डी ची पावती बनवतो... बस्स ...एवढेच काम ...!

हे म्हणजे असे झाले... एखाद्या पिक्चरची जाहिरात 'प्रमुख आकर्षण: १७ प्रदीर्घ चुंबनदृश्ये !' अशी केलेली बघून एखाद्या सदा-'दुष्काळ'ग्रस्त सिंगल माणसाने तो आतुरतेने पाहायला जावे आणि त्या चित्रपटात फक्त कपाळावर घेतलेली कपाळकरंटी चुंबने बघणे नशिबी यावे  !


हात्तिच्या मायला.... !

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.