काही माणसे काही कारण, ओळख किंवा नाती नसताना लक्षात राहतात... असाच एक माणूस माझ्या मेंदूचा कोपरा व्यापून बसलेला... माझ्या लहानपणापासून बघतोय मी त्याला...
तसा तो इतरांपेक्षा थोड़ा हटकेच ... सावध चाल... चेहरयावर स्मित हास्य... हातात एक झोळी... आणि समोर उभा राहून विचारायचा... "साहेब... अगरबत्ती घेणार का?"
जगाच्या दृष्टीने तो म्हणजे एक मतिमंद, बिनकामाचा, निरुपयोगी...
माझ्या दृष्टीने तो म्हणजे एक नायक... वेगळ्या अर्थाने...
नोकरी नाही म्हणून जीव देणारे, घरी बसून रडणारे आपण सर्व'सामान्य' लोक... पण हा मात्र घरच्या लोकांसाठी ओझे बनून राहिला नाही... स्वताचा खर्च स्वताच कमवून नक्की भागवत असेल... पण स्वताच्या मानसिक अवस्थेचे त्याने वस्तु विकताना कधीच भांडवल केले नाही... अंगचटीला येउन वस्तु गळ्यात मारणारा salesman नव्हता तो... एखाद्याने नाही म्हटले तर स्वताहून बाजुला होतो... नेहमी अगरबत्ती विकणारा हा माणूस December आणि January मध्ये calenders विकतो... वस्तु वेगळी... हा मात्र तसाच...
एक गोष्ट मात्र नक्की... एवढ्या वर्षात त्याचा चेहरा आहे तसाच आहे... निष्पाप... चिंतेचा लवलेश नसलेला... हल्ली केस पिकायला सुरुवात झालीय... देहयष्टि मात्र तशीच... काटक... कदाचित देवाने मतिमंदत्वाचा अभिशाप देताना चिरतारुण्याचे वरदान दिले असावे...
लहानपणी शिवाजी पार्कात मी सायकल फिरवायला, पतंग उडवायला जायचो... आता कट्ट्यावर मित्र-मैत्रिणीबरोबर बसतो... तरी हा मात्र तसाच... स्थितप्रदन्य... कट्ट्यावर जी प्रेमी युगुल बसायची... त्यांची लग्न होउन कडेवर छोटी मुले आलेली... तरी हा मात्र तसाच... जणू काही याला Time machine मध्ये घातलाय आणि हा निरनिराळ्या कालखंडात फिरतोय...अगरबत्ती घेउन... जग कुठे चालले आहे याची त्याला फिकीर नाही... कदाचित तो मनातून आपल्यासारख्या लोकांवर हसत असेल...
कधी कधी माझ्या डोक्यात येते... हा अजुन किती दिवस असेच राहणार आहे... काही वर्षानी अख्खी दुनिया इकडची तिकडे झालेली असेल... "हम दो; हमारे दो" नंतर "एक चुल; एक मूल" वरून जग "दोघात तिसरा; आता सगळे विसरा" इथवर आलेले असेल... तेव्हा सुद्धा हा तसाच असेल का? काय माहीत... मी पार्कात बसलेलो असेन... माझ्या म्हातारया बायको बरोबर गप्पा-गोष्टी करत (म्हणजे मी सुद्धा म्हाताराच असेन तेव्हा ...) जर नातवंडाना अभ्यासातून वेळ मिळाला असेल तर ते सुद्धा बरोबर असतील... आणि हा भला माणूस आमच्या समोर दत्त म्हणूनउभा राहील आणि विचारेल... "साहेब... अगरबत्ती घेणार का?"
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा