एक मुलगा... होतकरू लेखक... पक्का निराशावादी... आणि प्रेमाचा भुकेला !! Deadly combination ना?? अशाच एका 'रिकाम्या' Valentine Day ला या महाभागाने मनोगत लिहिले... पुढे वाचा हिम्मत असेल तर...
"अजुन एक"....
झाडाच्या आड़ लपलेली प्रेमी युगुले बघून प्रेम कसे करावे याचे फुकटचे शिक्षण घेण्यातच आयुष्य बरबाद झाले माझे... छत्री असून सुद्धा प्रेमाच्या पावसात कसे ओलेचिंब भिजुन जातात ती प्रेम-पाखरे... आणि मी मात्र... डोक्यावर हात ठेवून आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट जसा शेतकरी बघत राहतो... तसेच विधात्याकड़े आशाळभूत नजरेने मनोमन साकडे घालतो...देवा...माझ्यासाठी बनवली आहे ना एखादी मुलगी... की विसरला आहेस तू या जगाच्या रहाटगाडग्यात... मुसळधार पावसात बसलेला माणूस मस्तपैकी भिजतोय ... आणि मी मात्र कोरडा ठणठणित... माझ्या प्रेमाच्या आकाशात फक्त नकाराचीच वीज कडाडतेय... आणि उपेक्षेचे ढग गिधाडासारखे घिरट्या घालत आहेत... माझ्या मरणासन्न मनाचे लचके तोडायला उपाशी नजरेने बघत आहेत काळतोंडे ...
अजुन एक Valentine Day फुकट गेला...
समुद्राच्या लाटा मावळत्या सुर्याच्या साक्षीने अंगावर झेलत बसलेली जोडपी बघितली की मी कधी त्या दगडापर्यंत पोहोचणार या विचाराने बेचैन होतो जीव... माझ्या मनातल्या लाटा झेलायला कुणाच्यातरी प्रेमाच्या संरक्षक भिंती असाव्यात... अगदी China Wall सारख्या लांबलचक आणि उंच... त्या भिंतीभोवती एखादीने अतिक्रमण करून बिनधास्त एक झोपड़ी बांधावी... आणि मी क्षणार्धात माझ्या हृदयातल्या वास्तव्याचा दाखला तिला बहाल करावा... असो... कल्पनेच्या वाळूत स्वप्नांचे तकलादू किल्ले बांधायचे हा माझा खेळच झालाय हल्ली...
फुकट गेला अजुन एक Valentine Day....
Valentine Day ला हृदयाच्या आकाराचे फुगे टाचणी लावून फोडतात... माझ्या हृदयाची गत मात्र टाचण्या लावलेल्या लिंबूसारखी झालीय...जणू काही रस्त्यावर ओवाळून टाकलेले... ओलांडून जायला सुद्धा मुली घाबरतात... एवढी वर्षे झाली... पण मला काही Valentine Day Special Card मिळाले नाही... रेशन कार्ड, PAN कार्ड, Voter कार्ड... असाच गठ्ठा वाढत जातोय... असेच चालू राहिले तर एक दिवस Senior Citizen कार्ड हातात येइल... पण माझे हात मात्र तसेच... कोणी Valentine Day Card देइल या अपेक्षेने फैलावलेले...
गेला रे गेला... अजुन एक Valentine Day फुकट गेला...
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१५ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा