साला एक नंबरचा फट्टू होता...
पाय पुढे न्यावा की मागे घ्यावा
की आहे तिथेच पाय ठेवावा?
असा विचार करतच आयुष्यभर
त्याने कधी पाउलच टाकले नाही
शेपुट घालण्यासाठीच फक्त पायाचा उपयोग
प्रत्येक परिस्थितीमध्ये काढला पळ त्याने
जीवाच्या आकांताने आपल्या बुडाला पाय लावून
अपयशाच्या मॅरॅथॉनमध्ये नेहमीच अव्वल
चड्डीची फाळणी आणि ढुंगणाची चाळणी
असाच तो एक नंबरचा फट्टू होता
पश्चातापाची ढगफूटी आणि फक्त विचारांचे वादळ
नाकर्तेपणाच्या मीठाने खारट झालेले अश्रु पुष्कळ
डोळ्यांच्या विहिरीत बारा महीने पाणी तुडूंब
अन गालावर ओला दुष्काळ नेहमीचाच
निश्चयाची उभी पीके कधीच आडवी झालेली
नैराश्याचे माळरान वाढवणारा तो शेतकरी
आणि त्यावरच स्वत:च्या घोडचुकांचे घोडे पोसत
वेगाने दौडतोय आयुष्याच्या शेवटाकडे
साला एक नंबरचा फट्टूच होता अगदी
शोकांतिकेचा नायक बनायची
त्याला पहिल्यापासूनच भारी हौस
पारो-चंद्रमुखी - सगळ्याना लाथाडून
फक्त बेवडा देवदास बनायचा सोस
प्रेमाच्या असफल कहाण्यांचे रचले ढीग
आणि सुनवतो हाल अगदी प्रत्येकाला
सहानुभुतिचा मिळालेला एक कटाक्ष
त्याला प्रेमापेक्षा सुद्धा मौल्यवान वाटतो
एक नंबरचा फट्टू होता साला
एखाद्या लहान मुलाला गोंजारावे
तसा तो स्वत:च्या दुःखाला कुरवाळतो
आपल्याच वेदना जगात सर्वश्रेष्ट समजुन
तमाम दुनियेवर सदैव जळफळतो
असाच एक दिवस मरेल तो झुरत
स्वत:च्याच हाताने रचलेल्या चितेवर
निष्प्राण शरीर जळत असताना सुद्धा
घाबरून त्याची हातभर फाटेल
कारण मेला...तरी तो साला एक नंबरचा फट्टू होता.....
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा