दहावी कसाबसा पास होउन मोरू 'महाविद्यालयात' गेला
इंग्रजाळलेल्या त्या कॉलेजात मोरू अगदी बावरुन गेला
पहिल्याच दिवशी प्रोफेसरने इंग्रजीतून प्रश्न विचारला
मोरुचा आज पुन्हा एकदा 'मोरू' झाला..
निश्चय केला त्याने मनात
जायचेच कोकाटेंच्या 'फाडफाड' क्लासात
पैसे भरले - इंग्लिश शिकला
नंतर मारून मुटकून बी.कॉम सुद्धा झाला
तेव्हाच त्याला 'बेकार' ही पदवी
अगदी फुकट मिळाली... ती सुद्धा खरीखुरी
बापाच्या उजाडत चाललेल्या कपाळावर
मोरुच्या भविष्याची चिंता दिसू लागली
एका संध्याकाळी मोरू गेला शिवतीर्थावर
मराठी नेत्याचे भाषण ऐकायला
"मराठी तरुणांनो व्यवसाय करायला शिका!!"
नेत्याने उपदेश केला गर्जत
हाताच्या मुठी हवेत उंचावत
मोरुने बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या
"मी मुंबईकर ! मी मराठी !!"
वडापावच्या गाडीवर तेलकट झालेल्या
स्वत:च्याच हातांकडे बघितले एकदा
तेच हात आपल्या खिशात घातले चाचपत
बसने घरी जायला पैसे नव्हते
मोरू तसाच घरी चालत गेला
एक भावी मराठी उद्योजक
स्वप्ने रंगवत गाढ झोपून गेला
नशिबाने की वशिल्याने होईना
मोरुला शिपायाची नोकरी मिळाली
एका गुजराथ्याच्या ऑफिसात
मोरू आपला गरीब साधाभोळा
विनातक्रार पडेल ती काम करायचा
आणि आपल्या ढोल्या शेठची
'पडेल' ती बोलणी अन मार खायचा
तिशी उलटल्यानंतर मोठ्या मुश्कीलीने मोरुला
चाळीतलीच एक पोरगी पटली
दिसायला अगदी कशीही असली
तरी मोरुच्या मनात भरली होती
कोणी शेजारी बघत तरी नाही ना
हे बघत तो तिला सिनेमाला न्यायचा
चौपाटीवर भैयाची भेळपूरी खाताना
मोरू पाकिटातल्या पैशांचा हिशोब करायचा
पण नशिबाने सुद्धा पलटी खाल्ली
मोरुच्या प्रेयसीने गुपचुप कलटी घेतली
पहाटे सहा वाजता दूधवाल्या भैयाबरोबर
हल्ली मोरू अजिबात दूध पीत नाही
झोपेतसुद्धा घोषणा देत असतो
परप्रांतीयांच्या आक्रमणाविरुद्ध...
परत एकदा नशिबाने कमाल केली !!
मोरुचे चक्क लग्न जमले...
दादरमधली जागा विकून
सगळे विरारला रहायला गेले
हल्ली मोरू रोज सेकंड क्लासच्या
डब्याबाहेर टारझनसारखा लटकताना दिसतो
डब्यात बॉम्बस्फोट झाला तर
बाहेरच्या बाहेर उडी मारेन म्हणतो
मोरुने हल्ली मांसाहार सोडून दिलाय
अहो नाही !! शेजारी जैन - गुजराथी नाहीत !!
त्याच्या पँटमध्ये जे पाकिट असते
तिथे वर्षभर 'श्रावण' चालू असतो
महीना अखेरीस पाकिटाची किंमत
आतल्या नोटांपेक्षा जास्त असते
एकदा मित्राने फुकट दिलेल्या तिकिटामधे
"भैय्या हातपाय पसरी" नाटक बघायला गेला
मोरुने टाळ्या पिटल्या...शिट्या सुद्धा वाजवल्या
घरी येउन परत गाढ झोपला नेहमीप्रमाणे
रोज रात्री मोरू दामूअण्णाकडून
सकाळचे शिळे वर्तमानपत्र मागून घेतो
मुंबईवर - मराठी माणसांवर
लिहिलेले गंभीर लेख वाचतो
परप्रांतीयांना दोन-चार शिव्या हासडतो
शुद्ध मराठीत - पण मनातल्या मनात
सवयीप्रमाणे मोरू गाढ झोपतो
कारण पुढच्या दिवशी त्याला
'Interview' ला जायचे असते
Jr. मोरुंना इंग्लिश शाळेत घालायला
कर्ज घेउन भरमसाठ डोनेशन द्यायला.....
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा