चरित्र नायक: इमरान हाशमी....??? वाचून गोंधळात पडला ना तुम्ही...
रुपाने सामान्य... देहयष्टी बेताचीच...अभिनय सुमार... तरी सुद्धा एखाद्याला हीरो म्हणून पिक्चरमधे घेत असतील आणि त्याला घेउन सुद्धा तो पिक्चर बरयापैकी चालत असेल... तर तो माणूस फक्त इमरानच असावा असे छातीठोकपणे तुम्ही सांगू शकता... मला आठवते... "आशिक बनाया आपने" च्या ट्रेलर मधे इमरानचा एक क्लोजअप शॉट आहे... त्यात तो हुबेहूब माकडासारखा दिसतो...इतका की music channel वर animal planet कुठून चालू झाले असे म्हणत मी channel बदलले होते त्यावेळी ...याला पिक्चर मिळण्याचे योगसुद्धा ठराविकच...मोती साबणाची जाहिरात जशी दिवाळीच्या सणातच होते तसा हा फक्त भट कँपच्या सिनेमामध्येच दिसतो... एखाद्या वाण्याने आपल्या निर्बुद्ध मुलाला दुकानात ओझे उचलायला फुकट वापरून घ्यावे अगदी तसे...
फाळकेंनी "मूक"पटांचा सुवर्णकाळ चालू केला... आणि इमरानने "मुका"पटांचा ओला सुकाळ गाजवला... त्याचा "मुका"भिनय लक्षात घेता "मुका घ्या मुका" चा हिंदी रीमेक करताना या "किस"न"राव शिवाय पर्याय नाही... त्याच्या फिल्ममधे इतक्या lips movement असतात की त्याचे studio मधले dubbing चे काम ५ मिनीटांमध्ये संपते म्हणे... Bollywood चा हा "मुका"दम नायिकांच्या ओठांचा "कीस" पाडण्यात इतका पारंगत आहे की त्याच्या तोंडी अख्खा नारळ जरी दिला तरी हा पठ्ठा क्षणार्धात खोबरे किसून देइल... अजीर्ण झालेल्या माणसाने ताटातली शेवटची पुरी जितक्या अनिच्छेने खावी तेवढ्याच भरल्या पोटाने (की ओठाने) काही वर्षांपूर्वी याने जाहीर केले की "मी आता कुठलेही kissing scenes करणार नाही"... लोक म्हणत होते की लग्न झाल्यावर इमरान बदलला हो... पण याचे खरे कारण म्हणजे "हैदराबादच्या एका मॉलमधे एक वात्रट पुरुष इमरानचा किस घेउन पळाला" ही सत्य घटना होय...असो...जेव्हा त्याला कळून चुकले की आपण बाकी काही करू शकत नाही तेव्हा हे साहेब पुन्हा एकदा "Crook" पिक्चरमधे "मुका"ट... सॉरी...मोकाट सुटले...
याच्या पिक्चरचा एक ठराविक pattern असतो... राजेश खन्ना आणि सुनील शेट्टीचे नशीब घेउन त्याला मिळालेली उत्तमोउत्तम गाणी... हिमेशच्या नाकातून निघालेले/प्रीतमचे चोरलेले/मिथुनचे स्वत:च्या घोगरया आवाजातले संगीत...अनैतिक संबंध/लफडी...आणि बेफिकीरपणे फेकलेले one-liners/dialogues... असले एकदम चाबुक combination...पण एक गोष्ट मात्र नक्की... आपल्या अभिनयाची मर्यादा पुरेपुर ओळखून आपल्याला झेपतील असेच पिक्चर करण्याची हुशारी तो बाळगतो... अगदी "अंथरुण" (bed scenes मधले) पाहून पाय पसरावे या म्हणीसारखे... Gola Brothers च्या acting school मधून बाहेर आल्यासारखा सराईतपणे गरमागरम वाफाळलेली दृश्ये तो लीलया "हाता"ळतो... खरेच...इमरानची "गादी" चालवणारा हीरो अजुन तरी bollywood मध्ये आलेला नाही...एकदा मी शेजारच्या काकांकडे TV वर channel surfing करत होतो... तर एका channel वर नेमके इमरानचे प्रणयदृश्य चालू होते... काकांनी सहजपणे विचारले... "अरे हा नेहमी आजारी असतो का..." मी म्हटले "नाही...का???" चिंतित स्वरात काका उत्तरले......"बघावे तेव्हा अंथरुणालाच खीळलेला असतो हा" मी पटकन channel बदलले... म्हटले या वयामध्ये काका इमरानकडून inspire झाले तर काकींचे काही खरे नाही...आधीच काकूंना दम्याचा त्रास...
गीता बसरा...सोनल चौहान... सायली भगत...उदिता...तनुश्री...निशा कोठारी...नेहा शर्मा... याच्या नायिका सुद्धा जणू पडदा व्यापून टाकणारे सुंदर ठोकळेच असतात... Once Upon a Time in Mumbai च्या Promos मधे प्राची देसाई बरोबर तुला उघडा पाहून माझा परम मित्र "अण्णा" उर्फ प्राची देसाईचा सर्वश्रेष्ठ चाहता अक्षरश: ढसाढसा आणि ओक्शाबोक्शी रडला माझ्या समोर... स्वत:च्या नशिबाला दोष देत तो चरफडला... "अरे माझ्या प्राचीला सुद्धा सोडले नाही रे या सैतानाने... एवढे कपडे फेडून कुठे फेडेल हे पाप...का नाही माझा मामा/काका Bollywood मधला??" त्याच्या अश्रूंचा महापुर बघून माझ्या घरात २६ जुलै चा प्रलय होइल अशी चिन्हे दिसायला लागली... त्याला कसेबसे समजावले..."अण्णा रे... माझ्या घरात रडून पूर आणलास तर मी 'तुम मिले' चा sequel काढेन इमरान आणि प्राची देसाईला घेउन... आणि तुला माहितेय इमरानने गँगस्टर मधे कंगनाचा कीस पाण्याखाली कसा घेतला होता ते"... अण्णा गालावरचे अश्रु पुसून मला म्हणाला..."भोसक्या...."
तर असा हा इमरान हाशमी...
काय माहीत...काही वर्षांनंतर काळ आणि Bollywood एवढे पुढे गेलेले असेल की सिनेमाच्या इतिहासात त्याचे नाव "एक चरित्र नायक" म्हणून आदराने घेतले जाईल....... आणि शेखर सुमनचा "उत्सव" बाल चित्रपट महोत्सवात दाखवला जाईल...!!
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा