दिवसभर ऑफिसच्या कामात देह अन् मेंदू खर्चलेला
आणि दिवसअखेरीस "मन"सुद्धा पार "कामा"तून गेलेले
उद्याच्या सोयीसाठी अन् परवाच्या आरामासाठी
आजचे असंख्य क्षण हातातून अलगद निसटलेले
Icecream सारखे विरघळलेले आयुष्य आता विश्रांतीच्या Freezer मध्ये
ऑफिसच्या पिंजरयातून सुटलेला एक पक्षी शीळ घालतोय आनंदामध्ये
घड्याळाशी शर्यत आणि स्टेशनच्या Indicator वर डोळा
Half-day लागू नये म्हणून जीवाचा आटापीटा सारा
फायलींच्या ओझ्याखाली दुपारी ४ वाजता उरकलेला लंच
Late sitting झेपवण्यासाठी चहा कॉफीचा पोटावर मारा
थकलेल्या शरीराची गाडी servicing ला दिलीय रिटायरमेंटच्या गॅ रेज मध्ये
ऑफिसच्या पिंजरयातून सुटलेला एक पक्षी शीळ घालतोय आनंदामध्ये
कुटुंबापेक्षा जास्त वेळ ऑफिसच्या सहकारयांबरोबर घालवलेला
आनंदाच्या प्रसंगी वाटलेले पेढे आणि दिवाळीत एकत्र खाल्लेला फराळ
रिटायर झाल्यावर वेळ कसा जाईल याची होती त्याला चिंता
जणू काही ऑफिसच्या टेबलाखाली पुरली होती त्याची नाळ
होइल ऑफिसमधल्या आठवणींची उजळणी अवचित आलेल्या कॉलमध्ये
ऑफिसच्या पिंजरयातून सुटलेला एक पक्षी शीळ घालतोय आनंदामध्ये
अजुन कसे ऑफिस मधून आलेत नाही 'हे' असे म्हणत
बायकोने प्रत्येक संध्याकाळी दाराकडे नजर लावलेली
तो ऑफिसमध्ये बिझी असताना मुलांचे लहानपण सरलेले
काल रांगणारी मुले आज त्याच्या पुढे सुसाट धावलेली
ऑफिसमध्ये गेलेल्या मुलांची प्रतीक्षा असेल आता बापाच्या डोळ्यांमध्ये
ऑफिसच्या पिंजरयातून सुटलेला एक पक्षी शीळ घालतोय आनंदामध्ये
सूना-जावयांमध्ये विस्तारलेले त्याचे वडीलपण आणि
सापडेल नातवांच्या अल्लड खेळांमध्ये बालपण हरवलेले
दुपारच्या शांत प्रहरी घ्यायला मिळेल एक छोटीशी डुलकी
बायकोबरोबर संध्याकाळच्या फेरफटक्यात तारुण्य परतलेले
शोधायचे जीवनगाणे बारीक आवाजात लावलेल्या Pocket Transistor मध्ये
ऑफिसच्या पिंजरयातून सुटलेला एक पक्षी शीळ घालतोय आनंदामध्ये
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा