सचिनच्या सुवर्णमहोत्सवी शतकाच्या बातम्या TV वर ऐकून झाल्या...राजकारणी संधीसाधूनी या बातमीचा घेतलेला चावा...म्हणजेच TV चॅनेलला दिलेले bytes... सचिनने Press Conference मध्ये मायमराठीमधून दिलेले उत्तर... एवढे सगळे बघून / ऐकून झाल्यावर सकाळी एकूण ३ वर्तमानपत्रांमधल्या "सचिन" स्पेशल coverageचे भक्तीपूर्वक पारायण झाले माझ्याकडून... जणू काही एखाद्या मठ्ठ मुलाने "पास" असा शेरा मारलेल्या प्रगतीपुस्तकाकडे हजारदा आश्चर्याने बघावे... किंवा एखाद्या प्रियकराने त्याला मिळालेले गुलाबी प्रेमपत्र असंख्य वेळा वाचावे... अगदी तसे...
काय योगायोग आहे पहा ना... "सचिन देव" बर्मन या अदभुत वल्ली वरून ज्याचे नाव "सचिन" ठेवले गेले... त्याच्या नावापुढे लोकानी "देव" ही उपाधी जोडावी हां दैवी चमत्कारच म्हणायचा !!
खांद्यावर गदा घेण्याऐवजी हातात बॅट घेतलेला हा सूक्ष्म रूपातला हनुमान खेळपट्टीवर गेला की समोरच्या संघाला तो "भीमकाय महारुद्रा" एवढा भासतो... गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलणारया कृष्णासारखे त्याने डोक्यावर बर्फ आणि भारतीय संघाचे ओझे विनातक्रार पेलले... एवढे यशाचे शिखर पादाक्रांत केल्यावरसुद्धा विटेवर अठ्ठावीस युगे उभा राहणारया पांडुरंगाप्रमाणे त्याचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले...
सचिनला "भारतरत्न" पुरस्कार मिळेलच... कदाचित Vatican सचिनला त्याने केलेल्या चमत्कारांसाठी "Saint" म्हणून देवत्व बहाल करेल... आणि तोपर्यंत सगळे गोलंदाज उरलेसुरले देव (म्हणजे ३३ कोटी वजा सचिन) पाण्यात बुडवून बसतील सचिन कधी रिटायर होईल याची वाट बघत... (आणि भारतीय गोलंदाज त्या देवांचे आभार मानतील की त्यांना कधी सचिनकडून मार खावा लागला नाही...)
बाकी जास्त काही लिहीत नाही... देवाची आरती छोटीशीच असली तर जास्त गोड वाटते...
सचिन देवापुढे "हेल्मेट-साष्टांग" नमस्कार !!!
Jab Main Chhota Bachcha Thaa…
१४ वर्षांपूर्वी
1 comments:
Good One Mate !
टिप्पणी पोस्ट करा