शनिवार, २८ जुलै, २०१२ |
3
comments
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 1): http://belekar.blogspot.in/2012/07/1.html
--------------------------------------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 2): http://belekar.blogspot.in/2012/07/2.html
--------------------------------------------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 3):
--------------------------------------------
त्या दिवशी सोसायटीच्या जिन्याकडून एक कोणीतरी नैराश्याने ग्रस्त झालेला इसम खांदे पाडून जाताना दिसला मला...क्षणभर मी त्याला ओळखलेच नाही ...
"अरे पक्या!! कधी आलात तुम्ही काश्मीरवरून! आणि कसा होता तुमचा मधुचंद्र..अर्थात हनिमून? मी ऐकले की तू तिकडे गेल्यावर तिकडचा सगळा बर्फ वितळला म्हणे!!"
"भोसक्या...झाली तुझी मस्करी करून?" (मित्रांसाठी पक्याकडे राखीव 'भ' आद्याक्षराचा साठा होता)
"अरे एवढे चिडायला काय झाले?"
"तुला नाही कळणार रे प्रेम-भुकेल्या माणसाची तडफड!"
"तू नक्की काय बोलतोस हे बऱ्याचदा नाही समजत रे मला...त्यापेक्षा 'वेटिंग फॉर गोदो' ही एकांकिका आणि 'नाटक नको' हे प्रायोगिक नाटक मला पहिल्या फटक्यातच समजले असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल!"
माझ्या या साहित्यिक टोमण्यावर फक्त तोंड वेंगाडले त्याने (अरे वाह...हातवारे अभिनय बंद?)
"तूच काहीतरी कारण काढून भांडण केले असशील वहिनीबरोबर (आता त्याच्यासमोर पिंकी नावाने कसे तिला संबोधू शकतो?) चार प्रेमाचे शब्द बोलायला कसे जमेल तुला? आणि बोलला असतास तरी क्रांतिवीरच्या नाना पाटेकरने DDLJ मधले SRK चे प्रणय-संवाद रागाच्या भरात गद्य-उतारा वाचून दाखवल्यासारखे भासले असेल वहिनीला!"
"मी फक्त रागीट आणि भांडखोर आहे असेच वाटते ना तुम्हा लोकांना?"
"मग तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा असणार रे? एकेकाळी हिंदी सिनेमामध्ये कुठलेही परदेशी पात्र दाखवायचे असले की Tom Alter शिवाय दुसरा पर्याय नसायचा (आता 'कल्की'ला सुद्धा त्याच कारणाने भूमिका मिळतात)... तसाच तुझा रोल सुद्धा ठरलेला आहे गडया..तिला काय बोललास ते सांग आता..."
"अरे माझे काही ऐकायला ती जागी तरी असली पाहिजे ना?"
"नक्की काय झाले तिकडे सांगशील का तू ?"
"पहिल्या दिवशीच आम्ही फक्त 1 तास site seeing करायला बाहेर पडलो... त्यातसुद्धा ती एवढी दमली कि पुढचे 6 दिवस तिने फक्त झोपून काढले...ते सुद्धा फक्त एकटीनेच!...सगळे दिवस तिने फक्त छतावरचा पंखा बघितला असेल...पण वेगळ्या अर्थाने!! आम्ही एक कार hire केली होती...तो बिचारा ड्रायव्हर हॉटेलसमोर वाट बघत राहायचा आमची ...मी मग माझे तोंड लपवून हॉटेलच्या मागच्या दाराने एकटाच बाहेर फिरायला जायचो ....त्या ड्रायव्हरचा गैरसमज झाला असेल की हे खूपच उत्साही नवविवाहित जोडपे दिसतेय...एवढे की खोलीमधून सुद्धा बाहेर पडायला वेळ नाहीय यांच्याकडे..."
"मग तू एकटे बाहेर फिरून केलेस तरी काय?"
"काय करणार दुसरे? कॅमेरा घेऊन बर्फ-झाडा-पाना-फुलांचे फोटो काढत राहिलो! एवढा खर्च केला होता हनिमूनसाठी...तो थोडा तरी वसूल व्हावा म्हणून मी आणि कॅमेरा दोघेच फिरत होतो वेड्यासारखे..."
"म्हणजे कॅमेराचा 'रोल' महत्वाचा होता तर...अरे हे म्हणजे असे झाले...आमीर खान ने प्रमुख भूमिका नाकारली म्हणून ती तुषार कपूरला ऑफर करण्यासारखे आहे..."
"मग काय...पहिलेच लग्न...हक्काची बायको...पहिलीच सुहागरात...आणि बेडवर गाढ झोपलेली बायको... 'टीप टीप बरसा पानी' गाण्याच्या मुखडयात आणि पहिल्या कडव्यामध्ये भिजलेल्या रवीना टंडन पासून लांब राहताना अक्षय कुमारला जेवढा त्रास झाला असेल त्याच्या शतपट वेदना मला झाल्या त्यावेळी..."
पक्याला ढसाढसा रडताना मला बघवले नसते म्हणून त्याचे जमेल तेवढे सांत्वन करून आणि त्याच्या पुढील वैवाहिक जीवनाला शुभेच्छा देऊन मी तिकडून सटकलो...
खरेच...एक लग्न रागीट आदमीको एकदम इमोसनल बना देती है यार!! "क्या से क्या हो गया" हे गाणे डोक्यात घोळवत मी पुढे चालत राहिलो...बायकोने सांगितलेली कामे पार पाडायला...
तिकडे पिंकीचे संसारात काय हाल झाले असतील याचे कुतूहल थोड्या दिवसातच शमले... कारण ....
---------
(क्रमश:)
---------
एका लग्नाची पहिलीच गोष्ट !! (भाग 4): http://belekar.blogspot.in/2012/07/4.html
3 comments:
छान लिहिले आहे.मज्जा आली.एक सूचना आहे. पुढचे भाग लिहिताना मागच्या भागाची लिंक दिल्यास बरे होईल. मागचा भाग माहित नसेल तर लिंक लागत नाही. तुमचा लिहिण्याचा वेग भन्नाट आहे.छान .
utsukta aahe pudhchya bhagachi.. mast lihile aahes..
Aniket
धन्यवाद पंत....तुमची सूचना मी अंमलात आणलेली आहे...आणि या कथेचे सगळे (म्हणजे एकूण 4) भाग लिहून झालेले आहेत...
Thanks अनिकेत
टिप्पणी पोस्ट करा