माझी साहित्यसेवा !!


"अहो लेखक साहेब !! जरा थांबा की  !!"

शिवाजी पार्कात सकाळी सकाळी माझ्यासारख्या हौशी आणि गुणी लेखकाच्या पाठीवर थाप पडलेली ऐकून मी मनातल्या मनात सुखावलेलो असताना "प्रशांत" नावाचा कुजका मनुष्य-'प्राणी' माझ्या नजरेस पडला… तेव्हा लगेच मला समजले की  ही पाठीवरची थाप नसून ढुंगणावरची लाथ आहे… मी मनाची तयारी केली …आलेल्या संकटाला सामोरे जायला…

"लेखक महोदय !! आज स्वारी इथे कुठे रस्ता चुकली…. आज आमच्या सारख्या मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांविषयी काहीतरी असंबंध खरडण्याचा विचार दिसतोय साहेबांचा !!"

मी उसने अवसान आणून म्हणालो "अरे नाही रे … हल्ली लिखाणासाठी वेळच मिळत नाही बघ… "

मित्र: "चला सुटलो बुवा आम्ही एकदाचे… तरीच मी बरेच दिवस म्हणतोय … तुझी काही खबर बात नाही हल्ली … जसे नवीन सिनेमाच्या प्रमोशन साठी स्टार मंडळी वाटेल त्या आणि दिसेल त्या टीव्ही शो मध्ये घुसतात …अगदी तसेच तु नवीन काही लिहिलेस की फेसबुक, SMS, Whatsapp मिळेल त्या मार्गाने आमचे डोके खातोस…. आणि हा सगळा आटापिटा कशासाठी??…. तर तू उधळलेली मुक्ताफ़ळे स्वतःच्या जीवाला व डोळ्यांना त्रास देऊन आम्ही वाचावी आणि त्याही नंतर तुझे खोटे कौतुक करण्यासाठी आम्ही काहीतरी प्रतिक्रिया नोंदवावी म्हणून… स्वप्रसिद्धिचा केवढा रे हव्यास तुला?? तुला तर मराठी साहित्यामधला पूनम पांडे किंवा राखी सावंत अशीच उपाधी द्यायला हवी खरे तर !!"

मी (मनातल्या मनात): माझी कंपनी माझे मोबाइल बिल भरते म्हणून काय झाले… माझ्या मोबाईलमधले बाकीचे सगळे contacts delete झाले तरी तुझ्यासारख्या दुष्ट माणसाला एकही मेसेज पाठवणार नाही मी लिहिलेलं अनमोल साहित्य वाच म्हणून ….!!

मित्र: आणि कसले रे तुझे टुकार विनोद ?? वाढलेले पोट आणि हाफ चड्डी घालून शिवाजी पार्कात फिरले म्हणजे तू शिरीष कणेकर झालास असे वाटते का तुला?

शिरीष कणेकर हे नाव ऐकताच आजूबाजूची प्रेममग्न (नीट वाचा… "म" लिहिलाय … "न" नाही !!) जोडपी, नाना नानी पार्कचे सदस्य आणि रस्त्यावर पहुडलेले रिकामटेकडे कुत्रे जागच्या जागी गारठले … अहो शिवाजी पार्कातल्या थंडीने नव्हे …तर हा माणूस आपल्यावर काहीतरी पाणचट लिहू शकतो या भीतीनेच ….

मित्र: लग्नाअगोदर एकदम भावुक कविता लिहायचास… आणि लग्न झाल्यानंतर मात्र तू फक्त विनोदीच लिहितोस …. म्हणजे तसे लिहिण्याचा निष्फळ प्रयत्न करून स्वत:चे हसे करून घेतोस …एवढा बदल कसा झाला रे तुझ्यात ?

मी (मनातल्या मनात): भोसक्या… आधी लग्न करून बघ …मग समजेल तुला की लग्न हा आयुष्यातला केवढा मोठा विनोद असतो ते…

मित्र: मला सांग … कोण वाचते रे तुझा ब्लॉग … तू स्वत:च वाचतोस स्वत:चा ब्लॉग की तुझ्यासारखेच हौशे-गवशे ब्लॉगर मंडळी आपापला वेळ वाया घालवतात? ….  मी तुझे लिखाण वाचतो …बदल्यात तु माझे लिखाण वाच… करा एकमेकांची फुकट हजामत… (महेश कोठारेच्या सिनेमातल्या टकलू हैवान सारखा हसत)

आधीच एवढे दिवस माझ्या ब्लॉगवर मी काही लिहिले नाही याचे अतीव दु :ख माझ्या सृजनशील मनाला इजा करत असताना अशा अमानुष क्रूर पद्धतीने भर पार्कात हा गावगुंड माझी साहित्यिक इज्जत लुटत होता… हे म्हणजे आठवडयाभराचा उपाशी असताना हगवण लागल्यासारखे झाले होते …. मला अजून आठवतेय… विनोद कांबळीने एका क्रिकेट सामन्यामध्ये टीव्हीवर थेट प्रक्षेपण चालू असताना भर मैदानात (स्वत:ची) पँट काढून आपल्या मांडीवर इंजेक्शन घेतले…नेमके तसेच या मित्राने (की शत्रूने?) हाक मारल्या नंतर सुद्धा मी तिकडेच बावळटपणे उभा राहून अशी दयनीय अवस्था माझ्यावर ओढवून घेतली होती… गुडघ्याखाली पोहोचलेल्या माझ्या हाफ पँटला हात ना लावता तो असे काही माझे वस्त्रहरण करत होता कि कोणत्याही क्षणी माझ्या अश्रुंचे बांध फुटले असते (शेवटी महाराष्ट्रामधल्याच "धरण  घोटाळा" योजनेमध्ये बांधलेले ते…फुटणारच!)"… अगदी श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये प्रेक्षकांनी दंगल केल्यानंतर विनोद कांबळी ढसाढसा रडला होता तसाच … (आज विनोदी साहित्य लिहिताना सारखा विनोद कांबळी का आठवतोय बरे?")… भर रस्त्यात हृदयविकाराचा झटका येईल असेच वाटत होते मला !! (परत तोच आठवतोय… हे देवा…कुठे आहेत वाहतूक हवालदार !!)

या भंपक माणसाला माझ्या पुढील पुस्तकाची बारा हजारावी आवृत्ती विकत सुद्धा देणार नाही असा मनोमन निर्धार करताना माझ्यातला आनुवंशिक कोकणी काटेरीपणा आणि मित्रांकडून भेट मिळालेला पुणेरी खडूसपणा जागा झाला…

मी: मानले बुवा तुला… तुझ्या समीक्षक काक-दृष्टीतून काहीच सुटत नाही बरे….  तुझा साहित्य-व्यासंग खरेच दांडगा आहे … मला अजूनही लक्षात आहे….  कॉलेजमध्ये असताना तुला वाटायचे की  "राऊ" ही चिं.वि. जोशी यांची कादंबरी असून राऊ म्हणजे चिमणरावांच्या 'काऊ'ची बहिण असावी… वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असताना सुद्धा तुझा अख्खा दिवस लायब्ररीच्या fiction section मध्ये कसा जायचा याचे गुपित आम्हाला तसे तर फार उशीर समजले…. अत्रेंचे पुस्तक वाचताना ना.सी. फडके यांच्या पिवळ्या आणि अश्लील साहित्यावरची टीका वाचून अत्रेंना कायमचे सोडून तू फडकेंची सगळी पुस्तके वाचण्याचा जो काही सपाटा लावलास… आणि कहर म्हणजे त्यातली "महत्वाची पाने" टिपून त्याच्या फोटोकॉपीजचा तू एक खास संग्रह बनवला होता म्हणे !! आणि हा ….  मंगेश पाडगावकरांच्या 'सलाम' कवितेमधले "डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम" हे एकच वाक्य तुला आवडले होते !! अशी तुझी अभिजात साहित्यिक अभिरुची !! मला सुद्धा याच पद्धतीने तुला सलाम करावासा वाटतोय रे !!"

मला कधी नव्हे ते बोलताना पाहून आणि पार्कवासियांसमक्ष केलेले त्याच्या साहित्याप्रेमाचे केलेले  शाब्दिक शवविच्छेदन ऐकून तो हाताऐवजी दोन्ही पाय ढुंगणाला लावून पळून गेला !!

लोकहो… तर आहे हे असे आहे… मी एक खरोखरच उच्च दर्जाचा विनोदी लेखक आहे; असे (फक्त) माझे प्रांजळ आणि प्रामाणिक मत आहे … आणि का असू नये …गल्लीत चेंडू-फळी खेळण्याची लायकी नसलेले  दिल्लीमधले राजकारणी क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी होऊ शकतात…. ग्रेसी सिंग आमिर खानची नायिका बनू शकते … आमिर खान 'अव्वल नंबर वन' सारखा टुकार चित्रपट करू शकतो…. डॉक्टर गिरीश ओक 'फु बाई फु' मध्ये विनोदवीर म्हणून पाट्या टाकू शकतात…तर मी काहीही करू अथवा होऊ शकतो असा माझा समज आहे…. आणि जो माणूस news channel वर सहा छोट्या चौकोनात दिसणाऱ्या माणसांची  वेगवेगळ्या दिशेला भरकटलेली "भारताला महासत्ता कोण बनवू शकतो… समाजवाद, भांडवलवाद, लेनिनवाद की  मार्क्सवाद ??" या विषयावरची चर्चा तासनतास बघून त्यातले सगळे काही समजले असे भासवू शकतो; अशा या माझ्या कमनशिबी मित्राला माझा विनोद कळत नसेल तर मी बापुडा काय करू शकतो …आणि त्याचेही काही सगळेच चुकत नसेल… आजकाल विनोदाचा दर्जा इतका खालावलाय की …. स्टेजवर एन्ट्री घेताना एखाद्या गाण्याचे विडंबन करून ते आपल्या भसाड्या आवाजात गात , अंग-विक्षेप करत नाचत आले किंवा 'बेंचवर' उभा करीन हे शिवी दिल्याच्या आविर्भावात म्हटले की विनोद-निर्मिती होते असा काही कलाकारांचा गैरसमज झालाय …. असो… तो माझा विषय नाही …

विनोदी  विषय सोडून बाकी कुठल्या विषयावर मी लिहू शकतो हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो … प्रवासवर्णन लिहिण्याचा काही वाव नाही कारण पोटापाण्यानिमित्त दादर ते वरळी आणि माझ्या सासरी काही भेटवस्तू मिळणार असेल तरच मुरबाड आणि फुकटचे आंबे खायला फारफार तर वर्षातून एकदा माझ्या कोकणातील गावी … या पलीकडे माझा आणि प्रवासाचा तसा काही संबंध येत नाही… मारुती चित्तमपल्ली यांच्यासारखे वन्यजीवनाबद्दल काहीही लिहू शकत नाही मी …. दत्तक घेतल्यासारखे आमच्या उरावर नाचणारे उंदीर आणि बिल्डींगच्या खाली फिरणाऱ्या रेड्याएवढ्या घुशी बघून आपला इवलासा जीव पंज्यात धरून पळणाऱ्या मांजरी … हे एवढेच काय ते प्राणी माझ्या बघण्यात येतात… बरे… सिडनी शेल्डन सारखी एखादी प्रेमपूर्ण कादंबरी सुद्धा लिहू शकत नाही मी (सिडनी "ही"  नसून "हा"  आहे हे मला हल्लीच समजले …म्हणजे वाचण्यात आले … दुसऱ्या कुठल्याही मार्गाने समजलेले मला चालले'नसते!!)… लग्न होण्यापूर्वी कुठलीही मुलगी  'पटली ' नाही आणि लग्न झाल्या नंतर बायकोचे नेहमीच बरोबर असणारे म्हणणे 'पटवून' घेणारा मराठी मध्यमवर्गीय विवाहित माणूस कसली Mills & Boon वाली कादंबरी लिहितोय… हा आपला प्रांत नव्हे गड्या !!… यश चोप्राच्या सिनेमामधल्या नायिकेचे बाथरूम माझ्या वन रूम घरापेक्षा मोठे कसे असा प्रश्न मेंदूत घोळत असताना असे प्रणयप्रधान सिनेमे पाहणे कधीच माझ्या पचनी पडले नाही …. (यश चोप्राच्या मनात आले असते तर उकडीचे मोदक आणि पुरणपोळी हे पंजाब मधल्या घराघरात रोज बनणारे पारंपारिक पदार्थ आहेत असे सुद्धा दाखवले असते त्याने !!)

असो… विषयांतर होतेय ना….

तर  त्या दिवशी माझ्या लिखाणाचे टिपण कागद बराच वेळ मी घरातल्या अडगळीत शोधत होतो… शेवटी माझ्या बायकोला विचारावेच लागले मला…
"अग …. ऐकलेस का … माझे लिखाण कागद कुठे बघितलेस का ?"
माझा प्रश्न ऐकून बायको खेकसलीच माझ्या अंगावर …. "जरा तुमचा भिंगाचा चष्मा तुमच्या डोळ्यासकट  त्या लाकडी कपाटात न्याल का?"

लगेच मिळाले माझे कागद !!

झोपडपट्टीतून म्हाडाच्या जागेत गेल्यासारखे एकदम सुरक्षित आणि पद्धतशीर ठेवलेले ते कागद पाहून मला माझ्या बायकोचे फार कौतुक वाटले…

"किती जपतेस ग माझ्या लिखाणाला…!!"

बायको: "डोंबल… पैसे घेऊनही एखादा वाचक तुमचे लिखाण वाचायला तयार नाही आणि रद्दीवाला पैसे देऊनही तुमचे लिखाण रद्दी म्हणून न्यायला तयार नाही… दातावर मारायला अन्न नाही असा उंदीरसुद्धा तुमचे लिखाण कुरतडण्यासाठी त्याचे शिवशिवणारे दात लावायला तयार नाही… ते जाऊ द्या … परवा आपले बाळसुद्धा त्या कागदावर शी करायला तयार नव्हते… शेवटी मी 'जुना-काळ' वर्तमानपत्र दिले तेव्हा कुठे आपला 'नवा-बाळ' त्याचे काम साधायला तयार झाला…. काहीच म्हणून उपयोग नाही तुमच्या लिखाणाचा !! 'शी' बाई !!"

त्या दिवशी मला समजले की त्या वर्तमानपत्राला माझा एक मित्र "हगऱ्या-लेखांचा बादशहा" का म्हणतो ते !!

बायकोचे पुराण पुन्हा एकदा चालू झाले …. "माझ्या माहेरी तुमच्यामुळे माझी किती थट्टा करतात सगळे ….हिचा विक्षिप्त नवरा बोलत तर काहीच नाही … आणि स्वत:शीच हसत कागदावर काहीतरी खरडत बसतो …. तुम्हाला काय म्हणतात माहितेय का … बर्फी मधली झिलमील !!"

बायकोचे आकांडतांडव ऐकून मी लगेच बर्फी मधल्या रणबीर कपूरची भूमिका स्वीकारली !!

स्वयंपाकघरातले साहित्य माझ्या कपाळावर येउन आदळण्यापेक्षा माझ्या साहित्यसेवेकडे लक्ष दिलेले बरे !!


(माझ्या लेखनकलेला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या गोड बायकोची माफी मागून!!)

2 comments:

  1. Unknown म्हणाले...:

    खरोखर बर्याच दिवसांनी असे चांगले (स्वतःचीच घेणारे) वाचायला मिळाले... लिहित रहा मित्रा... जमलच तर WhatsApp वर संपर्क करा 9860286239

  1. Yogesh म्हणाले...:

    नक्की ! ☺

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.