बटाट्याची सोसायटी: महाभाग १: परब काका

"मेल्या माका शिकवतस खयचो रत्नागिरी हापूस आणि खयचो देवगड हापूस तो ?? तुझ्या बापसान तरी कधी बघितलो होतो काय रे कोकण? कोकणात जयथय पसरलास म्हणून काय आमच्या उरावर बसतलास? आमचे आंबे आमकाच विकूक इले हत …. फटकेक गाव मायझयां…."

खालच्या मजल्यावर चाललेले हे भैय्याचे "मालवणी वस्त्रहरण" ऐकून आमच्या सोसायटीमध्ये राहणारे परब काका आज काही त्या भैय्याला परत उत्तरप्रदेश मध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाहीत अशीच चिन्हे दिसत होती …

परब काका तसे चार पाच वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये त्यांच्या मुलाकडे राहायला आलेले … तसे मूळचे ते कणकवली मधले …. मात्र मुलाने चांगले शिकून सवरून मुंबईमध्ये बस्तान जमवले … आणि नातू झाल्यावर "आजी आजोबा"च्या उरलेल्या आयुष्याची बदली कोकणातून मुंबईत झाली… आणि काही वर्षांनी नात झाल्यावर अजून एक जबाबदारी अंगा-खांद्यावर बागडू लागली …

म्हणावे तर परबकाका फक्त शरीराने इथे हजर होते… त्यांचे हृदय मात्र ते घराच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडावरच ठेवून आले होते…. अगदी माकड आणि मगरीच्या गोष्टीमधल्या माकडाच्या गोड गोड काळजासारखेच … तसे ते वर्षातून दोन तीनदा गावी जातात मुला-सुनेच्या सुट्ट्या सांभाळून आठवडाभरासाठी … पण ते म्हणजे आमीर खानच्या तारखा मिळाल्या नाहीत म्हणून तुषार कपूरला घेऊन चित्रपट करण्यासारखे आहेत…

आज सकाळीच मला परब काका morning walk ला जाताना भेटले… हातात रत्नागिरी टाईम्स होता …

मी मस्करीतच म्हणालो " काय काका … सकाळीच पेपर घेऊन कुठे चाललात ??"
काका : मेल्या म्हाताऱ्याची केंड करतस काय… मीच गावलंय काय तुका ?
मी: अहो नाही हो… म्हटले घरात पेपर वाचायचा सोडून बाहेर कुठे घेऊन चाललात?
काका: अरे गावच्या बातम्या मुंबईच्या बंद खोलीत वाचूक कायोव मजा येत नाय … मैदानात झाडाखाली बसून वाचला म्हणजे डायरेक्ट थयसर पोहोचतय मी …
मला हसूच आले त्यांचे हे सदेह कोकण प्रयाण ऐकून … या मालवणी तुकारामाला न्यायला आमच्या मैदानात पुष्पक विमान आल्याची कल्पना केली मी …

काका : काय रे झिलग्या … तुझ्याबरोबर मालवणीतच बोलतंय मी…  ता चालता ना तुका …तसो तू आमच्या कोकणामधलोच … तुका थोडा तरी समाजतलाच मी काय बोलतय ता … तेवढाच माका बारा वाटता … "
मी: बिनधास्त बोला काका… मला मज्जाच येते ही माझी मातृभाषा ऐकायला… मी सुद्धा तोडकी मोडकी मालवणी बोलायला प्रयत्न केला असता तुमच्यासमोर… पण ते म्हणजे ताटात बांगड्याचे कालवण असताना बाजूला दुधीची पचपचीत भाजी वाढण्यासारखे आहे… आणि हे काय …आज एकटेच आलात … तुमची soul-mate कुठे आहे?
काका: डोंबलाची सोलमेट … आमका फक्त सोलकढीच काय ती मायती असा… आज तिचे गुडघे जास्तच दुखत असत म्हणून इली नाय ती … स्वप्नातसुद्धा ती अंगणातलो पतेरो झाडत असता …मगे गुडघे दुखतले नायतर काय होतला …
चालता चालता आम्ही एका आंब्याच्या झाडाखाली येऊन थांबलो … फेब्रुवारी महिन्यात मस्त मोहोर फुलला होता झाडावर  …
झाडाकडे बघत काका म्हणाले … "आमचा झाड़सुद्धा असाच मोहरलेला असतला आता.… पाऊस पडलो नाय म्हणजे मिळवला … समोरच्या शिरोडकरांकडचा बिटकीचा झाड़ द्राक्षासारखा दिसत असतला !"
काकांच्या डोळ्यात आंबा मोहोरताना दिसू लागला होता… त्यांचे डोळे आंब्याएवढे मोठे दिसू लागले होते आता…

आम्ही झाडाखाली बसलो थोड़ा वेळ.… काका पेपर चाळू लागले ... वाचता वाचता अचानक ओरडले …
"रे माझ्या रवळनाथा … आता काय झाला परत ??"
मी दचकुन विचारले काकांना … काय झाले हो काका…
काकांनी मुख्य बातमी दाखवली … कोकण रेल्वेवर दरड कोसळली …कोकण रेल्वे ठप्प…
मी: तुमचे तिकीट आहे का आज उद्याचे?
काका: नाय रे …. मी कसलो जातंय … माझ्या गाववाल्यांका त्रास होतलो म्हणून करवादलय …

काकांचे समस्त कोकणवासियांवर हे असे प्रेम होते…कणकवलीत होणाऱ्या निवडणुका आणि घडणारे राडे यांचे कव्हरेज ते एखाद्या सराईत पत्रकाराप्रमाणे करतात … आपले एक मत चुकले आणि कोकणचा होऊ शकणारा विकास खुंटला याचा पश्चात्ताप त्यांना निवडणुकीदिवशी होत असतो… कोकणचा विकास फक्त राजकारणी लोक करू शकतात असे त्यांना वाटते… आणि का वाटू नये असे… संतोष जुवेकर किंवा सोनाली कुलकर्णी (ज्यु ) यांचा घोगरा आणि भसाडा आवाज चित्रपटामधल्या गाण्यांत अचानक सुमधुर होऊ शकत असेल तर या जगात काहीही होऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे…

 कोकणची माणसे साधी भोळी हे गाणे त्यांनी शब्दश: मनावर घेतले होते … हा समज त्यांच्या प्रत्येक वाक्यामधून ठासून भरलेला असतो… परबकाकांकडे भुताच्या गोष्टींचा खूप साठा होता… पण त्या गोष्टींमधली कोकणची भुते सुद्धा प्रेमळ होती….

काका: एकदा काय झाला … माझ्या आजोळाक फोंडाघाटजवळ एक मोनो वहाळ असा … त्या नदीच्या पाण्याचो वाहताना कदी आवाज येत नाय म्हणून तो मोनो वहाळ… तर तिकडे एक पोरगो वाट चुकलो शाळेतून घरी येताना …. आणि मगे थयसरच बसून रव्हलो रात्रभर … आणि तकडे तर भूतांची मांदियाळी … पण त्या पोराक एक चांगलो भूत भेटलो… त्या भुतान पोराक घराक नेउन सोडल्यान … जसा घर जवळ इला तसा बाहेर थांबान पोराक घरात जाउक सांगीताल्यान आणि स्वता गायब झालो… 

कोकणातली माणसे एवढी गप्पीष्ट आणि त्यात ही नदी कशी मुकी झाली हे मला न उलगडणारे कोडे आहे… या गावात बायको हरवली म्हणून कुठलाही नवरा खुश होत नसेल… प्रत्येक वेळी आपली मुले हरवण्याची सवय असणारी निरुपा रॉय या गावात राहणारी असती तर बरेच हिंदी चित्रपट अपूर्ण राहिले असते….

 काकांच्या अजून एका गोष्टीत त्यांच्या सरपंच आजोबांना रात्री वाटेत एक भूत कसा भेटला…   वाटभर त्यांच्या कशा गप्पा रंगल्या आणि त्यांनी चालत चालत विड्या कशा शेअर केल्या याचे रसभरीत वर्णन काका करतात … तो भूत जेव्हा आजोबांना बाय बाय करून वळला तेव्हा त्याच्या पाठचा सापळा दिसून आजोबांना समजले की तो भूत होता म्हणून… तर अशी ही काकांच्या गोष्टीमधली कोकणी भुते; जी एकदम चांगली आणि प्रेमळ असतात… काकांनी रामसे ब्रदर्सच्या चित्रपटांची कथा लिहिली असती तर त्यातली भुते आर्ट फिल्ममधल्या अमोल पालेकरसारखी निरुपद्रवी असती … 

पण काकांचे हे कोकण प्रेम त्यांच्या तिकडच्या शेजाऱ्यांना लागू नाही होत… काका मुंबईत असल्यामुळे बंद घराच्या अंगणातली फळे आणि फुले शेजाऱ्यांच्या अनुक्रमे पोटात आणि देव्हाऱ्यात विराजमान होतात…  आणि हा विषय निघाला की काकांची शिव्यांची लाखोली शेजाऱ्यांच्या सात पिढ्यांचा लखलखाट करते… 
काका: मी एकदा घरात दुपारी झोपलेलय … तर तो मायझयो आमच्या जांभळाच्या झाडावर चढलो… ओरडण्याचो आवाज इलो म्हणून धावत गेलय तर यो रांडीचो झाडावरून घसपटत खाली इलेलो… झाडाची साल खयची आणि याच्या कुल्याची चामडी कुठली ता कळेना त्याका…एवढो सोलवटलो होतो त्याचो कुल्लो….  बोंबलत होतो होळीतल्या शिमग्यासारखो… लगेच धावत जाउन घरातसून मीठ घेऊन गेलय… त्याका वाटला जांभळाक मीठ लावून त्याका खाउक देतलय… त्याच्या ढुंगणावर मीठ ओतुक गेलय तेव्हा पळून गेलो हरामखोर… 

काकांच्या चुलत्यांनी काकांच्या लहानपणी त्यांना सोन्याचा दागिना मातीमध्ये पुरला की सोन्याचे झाड उगवते असा सल्ला दिला होता … परबकाकांनी निरागसपणे तो अंमलात आणला आणि बरेच दिवस झाले तरी झाड उगवले नाही म्हणून माती उकरून बघितले तर सोन्याची माती झालेली… चुलत्यांकडे तक्रार घेऊन गेले तर त्यांनी भोक पडलेल्या बनियन सकट हात वरती केले… काकांना त्यांच्या शेजाऱ्यांची आणि चुलत्याची आठवण करून दिली आणि म्हटले की ही माणसे कोकणातली असून अशी कशी वाईट वागतात … तर काकांचे उत्तर येते "थोडी वर्षा मुंबईत काढल्यान त्यांनी … म्हणून ता…. "
मी: मग मुंबईत राहून तुम्हीसुद्धा असेच बिघडला असाल ना … 
काका : आता अर्धी लाकडा मसणात गेली असत … आता कसलो बदलतंय मी … तूच ये कोकणात रवूक … तुझो खडूसपणा जातलो बघ….

काकांच्या मते कुठलाही दुर्वर्तनी माणूस कोकणात जाउन स्वत:चे परिवर्तन घडवू शकतो…असे खरेच घडत असेल तर शक्ती कपूर आणि मोहनीश बेहल यांसारखे खलपुरूष सुरज बडजात्याच्या चित्रपटात सद्गुणांचे पुतळे बनतात त्याप्रमाणे जगातल्या सगळ्या वाईट माणसांना कोकणातल्या सुधारगृहात डांबून ठेवून हे जग सुंदर बनवायची माझी योजना आहे… 

काकांच्या मते मच्छिंद्र कांबळी हाच खरा सुपरस्टार… प्रत्यक्ष रजनीकांतला सुद्धा तात्यांसारखी फ़ास्ट डायलॉग डिलिवरी जमणार नाही …. आताच्या अभिनेत्यांमध्ये फक्त वैभव मांगले आवडतो त्यांना….ते सुद्धा तो गावची भाषा बोलतो म्हणूनच….दशावतार नाटकाबद्दल काका एवढे समरसून बोलतात की कुठल्याही क्षणी या माणसाचे शंकासुरामध्ये रुपांतर होऊन वेदा ऐवजी आपल्याला कोकणात पळवून नेईल अशी भीती वाटते…  एकदा सहज कोणी बोलून गेले की काय ते मालवणी लोक एवढी गर्दी करून अंगणेवाडीच्या जत्रेला जातात … काका एवढे भडकले होते ते ऐकून … "माउंट मेरीच्या जत्रेत तुमी जातला आणि दुसऱ्या दिवशी अख्ख्या जगाक स्टाईल मारत सांगतलास माउंट मेरीक गेललात म्हणून … आमच्या जत्रेक नाव ठेवतास काय !"

प्रत्येक गोष्टीची तुलना कोकणाशी करायची काकांना सवयच आहे… कॉलनीमध्ये मासे विकत घेताना काका भेटले की त्या मासेवाली समोरच काका बरसतात …"कसले बर्फातले मासे खातला तुम्ही मुंबईकर … आमच्या गावाक येवा… नदीतले मासे तुमच्या ताटात तडफडून जीव देतले एवढा ताजा म्हावरा गावतला तुमका… " मग जे काकांचे "संगीत मत्स्य कल्लोळ" चालू होते ते त्यांच्या तोंडाला पाणी सुटून ते मासेवालीच्या टोपलीमध्ये पडेपर्यंत… काकांना कोकणचे brand ambassador म्हणून का नेमत नाही हा मला पडलेला गहन प्रश्न आहे…  

एकदा काकांच्या घरी सकाळीच काही कामानिमित्त गेलेलो तर त्यांची देवपूजा चाललेली… मी थोडा वेळ सोफ्यावर बसून त्यांचे निरीक्षण करत होतो… एकाच वेळी आलटून पालटून त्यांचे मंत्रोच्चार आणि देवपूजेचे साहित्य आणून द्यायला उशीर करण्याऱ्या काकूंचा माहेरासकट उद्धार हे दोन्ही चालू होते … एका क्षणी तर भान विसरून काका देवाला शिव्या द्यायला लागले आणि काकूंकडे बघत मंत्र म्हणायला लागले … मीच काय … देव सुद्धा चपापला असेल क्षणभर… 

त्यादिवशी काका भेटले… थोडे शांतच वाटत होते … 
मी: काय काका … गावची आठवण येतेय का ?
काका काहीच बोलले नाहीत …
मी: कधी होणार तुमची आग्र्याहून सुटका ?
काका : आता आमची इथून बदली थेट वरतीच होतली असा वाटता …गावचा घर तसाच बंद रव्हतला… 

काकांच्या नजरेला नजर भिडवता येईना मला… तरीही मनात चमकून गेले… स्वर्गातसुद्धा इंद्रादी देवांसमोर काका कोकण स्तुतीच आळवतील … ज्याने कोकण बनवले त्या बापालाच सांगतील परबकाका … आमच्या कोकणात येवा एकदा !


कोकणची माणसे साधीभोळी ….त्यांच्या काळजात भरली शहाळी… 

2 comments:

  1. Unknown म्हणाले...:

    वाह पु लं चा अंतू बर्वा आठवला

  1. Yogesh म्हणाले...:

    Thanks विनय ☺

Blog Archive

माझ्या विषयी बोलू काही...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
I started writing my blog because no publisher was ready to publish my articles...even though I was ready to pay them a good amount of money...and I will continue to write posts on this blog as long as my friends don't ask for money to read my blog!!... I don't write regularly...as I am not a seasoned writer..but seasonal one... If I write any post of sub-standard quality, I don't blame myself for it...I blame it on the 'Law of Averages'... I always appreciate criticism about my blog...It discourages me from taking blog-writing as a full-time profession...Criticism forces me to continue with my job and increases the probability of earning any income from 0 to 1... Warning: Most of the characters/situations are fictional and exaggerated...They don't have any resemblance towards any real life incident or any person (dead or alive)...

माझा इंग्रजी ब्लॉग....

मराठी ब्लॉगविश्व

Blogger द्वारे प्रायोजित.